दुबईला फरार होण्यापूर्वी आरोपी ईडीच्या जाळ्यात
‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणातील संशयित
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
कथित कॅश फॉर व्होट प्रकरणात ईडीने बुधवारी एका व्यक्तीला अटक केली. नागनी अक्रम मोहम्मद शफी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमदाबाद विमानतळावरून तो दुबईला जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत नव्याने उघडलेल्या 14 खात्यांमध्ये 100 कोटींहून अधिक रक्कम जमा केल्याप्रकरणी नाशिकच्या मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबरला शफीविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पॅश फॉर व्होट प्रकरणात जायस लोटन मिसाळ यांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. सिराज मेमन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या ओळखीच्या कागदपत्रांचा तसेच त्याचा भाऊ गणेश मिसाळ आणि इतरांच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्या तयार करण्यात आल्या. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत या कंपन्यांची खाती उघडून कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचा दावाही केला जात आहे.