‘शीशमहाल’ वाद पोहचला शिगेला
आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा रोखला प्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपल्या अधिकृत सरकारी निवासस्थानाला अलीशान बनविण्यासाठी 60 ते 70 कोटी रुपये खर्च केले आहेत, असा अहवाल कॅगने दिल्यानंतर आता हा या वादाची व्याप्ती वाढली आहे. आम आदमी पक्षाने हा अहवाल फेटाळला असून बुधवारी या पक्षाच्या नेत्यांनी अनेक पत्रकारांना हे निवासस्थान दाखविण्याची योजना केली होती. तथापि, पोलिसांनी हे नेते आणि त्यांच्यासह आलेले पत्रकार यांना वाटेतच रोखल्यामुळे त्यांना शीशमहालाचे दर्शन घडू शकले नाही.
दिल्लीच्या फ्लॅगस्टाफ मार्गावर हे निवासस्थान आहे. या निवासस्थानात केजरीवाल यांनी त्यांच्या सुखसोयींसाठी मोठे परिवर्तन केले आहे आणि कोट्यावधी रुपयांचे धन जनतेच्या पैशातून खर्च केले आहे, असा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचा आरोप आहे. मुळात अलीशान असणाऱ्या निवासस्थानावर इतका पैसा का खर्च केला गेला, असा प्रश्नही भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला.
आपने आरोप फेटाळले
निवासस्थान अलीशान बनविण्यासाठी प्रचंड खर्च केला गेला, या आरोपाचा आम आदमी पक्षाने इन्कार केला. निवासस्थानात काही परिवर्तन करणे आवश्यक होते. तेव्हढे करण्यात आले आहे. मात्र, मोठा खर्च करण्यात आलेला नाही, असे या पक्षाचे म्हणणे आहे. कॅगने सादर केलेल्या अहवालालाही या पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. पत्रकारांनी हे निवासस्थान आतून प्रत्यक्ष पहावे, यासाठी या पक्षाने एक योजना तयार केली होती. या योजनेनुसार पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी पत्रकारांना निमंत्रणे पाठविली होती. अनेक पत्रकार बुधवारी या निवासस्थानापासून काही अंतरावर उपस्थित होते.
मोर्चा अडवला
आम आदमी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि काही पत्रकार या निवासस्थानाकडे जात असताना त्यांना वाटेतच अडविण्यात आले. त्यामुळे त्यांचा मोर्चा तेथेच थांबला. पोलिसांनी या निवासस्थानापासून काही अंतरावर बॅरिकेड टाकून येण्याजाच्याचे सर्व मार्ग बंद केले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसही निवासस्थानाच्या बाहेर नियुक्त करण्यात आले होते. परिणामी, पत्रकारांना हे निवासस्थान आतून दाखविण्याची आम आदमी पक्षाचे योजना फसली होती.
आरोप काय आहेत?
केजरीवाल यांनी या निवासस्थानाचे स्वरुपच पालटून टाकले आहे येथे आतल्या बाजूला जलतरण तलाव, मद्याचा बार, सोन्याचे कमोड, महागडी झुंबरे आदी गर्भश्रीमंत व्यक्तींना शोभतील अशा सोयी करुन घेतल्या आहेत, असा आरोप आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर हे निवासस्थान आता दिल्ली प्रशासनाच्या ताब्यात आहे. नव्या मुख्यमंत्री आतीशी मारलेना अन्य निवासस्थानात वास्तव्यास आहेत. त्यांना अधिकृत निवासस्थानाचा ताबा काही तांत्रिक कारणांसाठी मिळालेला नाही. निवासस्थान सोडताना केजरीवाल यांनी सर्व महागडी फिक्चर्स काढून नेली आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थान
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत निवासस्थान आतून कसे आहे, हे जनतेला दाखवावे, असे आव्हान आम आदमी पक्षाने दिले आहे. या निवासस्थानातील सुखसोयींसमोर मुख्यमंत्री निवासातील सुखसोयी काहीच नाहीत, असे दाखविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केला असून आता अशा वादांना अधिकच धार चढणार आणि ती मतगणना होईपर्यंत टिकणार असे राजकीय तज्ञांचे मत आहे.