नव्या सैन्यप्रमुखांची निवड करणार शरीफ कुटुंब
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज लंडनमध्ये ः नवाज यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी
वृत्तसंस्था/ लंडन
पाकिस्तानात सैन्यप्रमुखांच्या नियुक्तीच मुद्दा तापला आहे. जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शाहबाज शरीफ हे इजिप्तमधून पाकिस्तानात न परतता थेट लंडन येथे पोहोचले आहेत. लंडनमध्ये शाहबाज हे स्वतःचे ज्येष्ठ बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार आहेत. लंडनमध्ये पूर्ण शरीफ कुटुंब एकत्र आल्याने नव्या सैन्यप्रमुखांच्या नियुक्तीवर चर्चा होणार असल्याचे मानले जातेय.
मरियम नवाज यापूर्वीच लंडनमध्ये पोहोचल्या आहेत. सैन्यप्रमुख नियुक्ती नवाज हे हस्तक्षेप करू इच्छित असल्याचे मानले जात आहे. स्वतःची पाकिस्तान वापसी आणि इम्रान खान यांच्या राजकीय आव्हानाला भेदण्यासाठी नवाज शरीफ यात लक्ष घालत आहेत. याचदरम्यान नवाज शरीफ यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी करण्यात आला आहे. नवाज हे आता लवकरच पाकिस्तानात परतणार असल्याचे मानले जात आहे.
कार्यकाळ विस्ताराची चर्चा
पाकिस्तान सैन्याच्या इंटर सर्व्हिसेस रिलेशन्सने (आयएसपीआर) जनरल बाजवा यांच्या कार्यकाळाला विस्तार मिळणार या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आयएसपीआरने सियालकोट येथे पोहोचलेल्या जनरल बाजवा यांचे छायाचित्र जारी केले आहे. बाजवा यांची तेथे फेयरवेल पार्टी होती असे आयएसपीआरचे म्हणणे आहे.
लेफ्टनंट मुनीर सर्वात वरिष्ठ
बाजवा यांच्यानंतर सैन्यप्रमुख होण्याच्या शर्यतीत लेफ्टनंट जनरल आसिम मुनीर हे सर्वात वरिष्ठ आहेत. मुनीर हे विद्यमान सैन्यप्रमुख बाजवा यांचे निकटवर्तीय आहेत. मुनीर हे यापूर्वी आयएसआय प्रमुख देखील राहिले आहेत. परंतु तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या नाराजीमुळे मुनीर यांना 8 महिन्यांमध्येच पदावरून हटविण्यात आले होते. मुनीर यांच्यानंतर फैज हमीद यांना आयएसआय प्रमुख करण्यात आले होते.