व्हाईटवॉशची नामुष्की
मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ओढवून घेतलेला व्हाईटवॉश ही नामुष्कीच म्हटली पाहिजे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हणतात. खेळ कुठलाही असला, तरी त्यामध्ये विजय आणि पराभव हा आलाच. परंतु, लढण्याआधीच एखादा संघ नांगी टाकत असेल, तर त्याला केवळ हाराकिरी असेच म्हणता येईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची सुमार कामगिरी ही याच चौकटीत बसते. टेंबा बवूमा याच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला, तेव्हा खरे तर त्यांना किरकोळीतच काढले गेले. आपल्या घरच्या भूमीवर बवूमा ब्रिगेड असा काय पराक्रम करणार, असाच आपला सुरुवातीला आविर्भाव होता. मात्र, पहिल्या कसोटीच्या प्रारंभीच आफ्रिकन संघाने आपल्याला जागा दाखवून दिली. खरे तर पहिल्या कसोटीत आफ्रिकेला 159 धावांत गुंडाळून भारतीय संघाने चांगली संधी निर्माण केली होती. पण, त्याचे सोने करण्यात आपला संघ कमी पडला. केवळ 20 धावांचीच काय ती आपल्याला आघाडी घेता आली. त्यात कर्णधार शुभमन गील जखमी झाल्याने सैरभैर झाल्यासारखी टीमची अवस्था झाली. हे काही चांगले लक्षण ठरू नये. वास्तविक दुसऱ्या डावातही आफ्रिकेचा वारू 153 मध्ये रोखल्याने विजय आपल्या हातात होता. मात्र, इतके सगळे अनुकूल वातावरण असतानाही ज्या पद्धतीने खेळाडूंनी शस्त्रे टाकली, ते भारतीय संघाकरिता अशोभनीयच ठरावे. उलटपक्षी खेळपट्टी साथ देत नसतानाही बवूमाने 55 धावा करून शेवटपर्यंत किल्ला लढवला. बवूमाकडून बोध घेत दुसऱ्या डावात आपण कमबॅक करणे अपेक्षित होते. भारतीय क्रिकेट चाहत्यांचीही तीच अपेक्षा होती. पण, तिथेही आपण मार खाल्ला. गुवाहाटी कसोटीत तळाला सेनुरन मुथुस्वामी व मार्को यानसन यांनी ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांची पिसे काढली, त्याला तोड नाही. मुथुस्वामीचे शतक व यान्सच्या झुंजार 93 धावांच्या धक्क्यातून आपण अखेरपर्यंत सावरलोच नाही, असे म्हणावे लागेल. पहिल्या डावातील आफ्रिकेच्या 489 धावांना आपल्याला चोख उत्तर देता आले नाही. यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकवले, पण, त्यात दम नव्हता. वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या सामन्यातही प्रतिकार केला. जडेजानेही गोलंदाजी व फलंदाजीत चमक दाखवली. पण, असा एखादा अपवाद वगळता भारतीय संघात लढण्याची वृत्ती दिसली नाही. के. एल. राहुल हा भारताचा अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला जातो. राहुलचे ताळतंत्र तसे चांगले. पण, तो इतका ढेपाळावा, हे आश्चर्यकारक. गीलच्या अनुपस्थितीत खेळवण्यात आलेल्या साई सुदर्शनला गोल्डन चान्स होता. पण, त्याचे चक्र फिरलेच नाही. उलट तोच सतत चक्रव्यूहात अडकत राहिला. प्रथमश्रेणी, आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोरी पाटी राहणार असेल, तर त्याचे भवितव्य कसे ठरणार, याचा त्याने विचार करायला हवा. ध्रुव जुरेलने कसोटी सामन्याआधी आफ्रिकेच्या संघाविरुद्ध धावांचा अक्षरश: रतिब ओतला होता. पण मोक्याच्या क्षणी हा तारा चमकलाच नाही. खरे तर फलंदाज म्हणून त्याला संघात घेण्यात आले होते. त्याच्या भरवशावर राहणे भारताला महागात पडले. ऋषभ पंतचा कसोटी परफॉर्मन्स आजवर चांगला राहिला आहे. पण, ज्या बेजबाबदार पद्धतीने तो खेळला, त्यातून पंतच्या फलंदाजीत प्रगल्भता कधी येणार, हा प्रश्न ठळक होतो. अष्टपैलू नितीशकुमार रे•ाrबाबत काय बोलावे? फलंदाजी, गोलंदाजी कशातच त्याला प्रभाव पाडता आला नाही. वास्तविक कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांचा कस लागतो. एकेकाळी भारतीय संघात तंत्रशुद्ध फलंदाजांची रेलचेल होती. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरभ गांगुली, विराट कोहली, अजिंक्य रहाणे असे एकापेक्षा एक खेळाडू संघात होते. आज मात्र अशा स्टायलिश फलंदाजांची संघाला वानवा जाणवते. बहुतेक खेळाडू आयपीएलसारख्या झटपट क्रिकेट स्पर्धांतून पुढे आले आहेत. कसोटीसारखा लागणारा पराकोटीचा संयम, तंत्र, पदलालित्य त्यांच्याकडे नाही. तसे पाहिले, तर वीरेंद्र सेहवाग किंवा रोहित शर्मा यांचे तंत्रदेखील कसोटीशी जुळणारे नव्हते. पण, टायमिंग ही त्यांची जमेची बाजू होती. त्या बळावर कसोटीतही ते यशस्वी झालेले दिसून आले. आजच्या खेळाडूंमध्ये तशी गुणवत्ता आहे का, असा प्रश्न पडतो. त्यात रणनीतीमध्ये आपण बरेच कमी पडलो. प्रशिक्षक गौतम गंभीरचे उफराटे निर्णय, अधिकाधिक अष्टपैलू खेळवण्याचा अट्टहास संघाला मारक ठरला. कसोटी क्रिकेटचा गाभा समजून न घेता गंभीरने अष्टपैलूंची खोगीरभरती केली. त्याने एक ना धड, भाराभार चिंध्या अशी आपली अवस्था झाली. गोलंदाज म्हणून बुमराह, सिराज, जडेजा वगैरेंची कामगिरी बरी म्हणता येईल. पण, आफ्रिकेच्या हार्मरने जशी हवा केली, तसे आपल्याला करता आली नाही. गेल्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा भारताला कसोटी मालिका मानहानिकारक पद्धतीने गमवावी लागली आहे. गंभीरच्या 19 कसोटी सामन्यांतील हा तब्बल दहावा पराभव आहे. हे बघता त्याला व संघाला व्यूहनीतीत बदल करावा लागेल. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांनी कसोटीतही प्रशिक्षक म्हणून अतिशय उजवी कामगिरी केली आहे. त्यांचा खेळाडूंशी असलेल्या संवादाचाही त्यात मोठा वाटा होता. गंभीरचा असा संवाद दिसत नाही. आगामी काळात त्याने संवादावर व सकारात्मकतेवर भर द्यायला हवा. सध्याचा कसोटी भारतीय संघ कुठल्याच बाबतीत समतोल वाटत नाही. त्यामुळे निवड समितीनेही ‘क्लास इज परमनंट’ हा दृष्टीकोन ठेवत कसोटीमध्ये कलात्मक खेळाडूंना संधी देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अजिंक्य रहाणेसारख्या कलात्मक खेळाडूला आपण संघाबाहेर ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे. परंतु, संघाची सध्याची गरज पाहता अशा खेळाडूंशिवाय पर्याय नसेल. कसोटी, वन डे आणि टी ट्वेंटी या तिन्ही फॉरमॅटचा अंदाज वेगळा आहे. एकाचे निकष दुसरीकडे लावता येत नाहीत. हे समजून घेतले पाहिजे. मागच्या काही वर्षांत आपला कसोटीकडे बघण्याचाही दृष्टीकोन बदलला आहे. पण, कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. हे ध्यानात घेऊन कसोटीमध्ये अधिक गंभीरपणे खेळायला हवे..