राधानाथ स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाने साधक तृप्त
मराठा मंदिरमध्ये महासत्संग कार्यक्रम
बेळगाव : भगवंत नेहमी वेगवेगळ्या रुपात, वेगवेगळ्या नावाने प्रकट होतात. ते सर्व शाश्वत व दिव्य आहेत. भगवंताच्या नामाचा जप केल्याने आपले चित्त शुद्ध होते. भगवंत भगवद्गीतेत सांगतात की जो माझे स्मरण करतो, त्याच्यावर मी प्रेम करतो. जे माझी भक्ती करतात, त्या सर्वांना मी ओळखतो. भगवंताच्या सर्व वैदिक ज्ञानाचा सार म्हणजे श्रीमद् भागवत या ग्रंथातील आठवा स्कंद आहे, असे विचार इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ संन्यासी प. पू. राधानाथ स्वामी महाराज यांनी व्यक्त केले. इस्कॉन बेळगावतर्फे 1 ऑगस्टपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. 4 ते 6 ऑगस्ट या तीन दिवशी राधानाथ स्वामी महाराजांनी बेळगाव येथील वास्तव्यात साधकांना मार्गदर्शन केले. मंगळवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे झालेल्या महासत्संगमध्ये ते बोलत होते. वृंदावनप्रभूंनी 30 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या हरे कृष्ण आंदोलनाने बेळगावात भव्य स्वरुप प्राप्त केले आहे.
हे शहर भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच आज हा समुदाय भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे, असे सांगितले. प्रारंभी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्तीरसामृत स्वामी, विजयेंद्र शर्मा, शंकरगौडा पाटील, बाळासाहेब काकतकर, शिवाजीराव हंगिरकर, अनंत लाड व भक्तांनी त्यांचे स्वागत केले. बालिकांनी हातामध्ये व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन त्यांचे स्वागत केले. यानिमित्त भव्य रांगोळी रेखाटली होती. प्रेमरस प्रभूजी यांनी राधानाथ स्वामींचा परिचय करून दिला. इस्कॉन चळवळीत 1971 ला राधानाथ स्वामींनी ठाण्यात इकोव्हिलेजची सुरुवात व मुंबईत भक्तीवेदांत हॉस्पिटलची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर राधानाथ स्वामी यांनी भौतिक संसाराला पार करणे कठीण आहे. भगवंताला शरण या, शरण येणाऱ्याचे ते रक्षण करतात, असे सांगून नदीत मगरीने पकडलेल्या हत्तीच्या पायाची व द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कथा वानगीदाखल सांगितली. सत्संगानंतर महाप्रसाद झाला.