खटारा कारमधील रहस्य
बिहारमधील एका मधमाशा पालकाने एक व्हिडीओ प्रसारित केला आहे, जो सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे. या मधमाशा पालकाची एक जुनी कार बऱ्याच वर्षांपासून गॅरेजमध्ये पडून होती. ती उपयोग करण्यास योग्य नसल्याने तिच्याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले होते. अनेक वर्षांनी हा मधमाशा पालक या गॅरेजमध्ये गेला, तेव्हा त्याला या कारच्या आतील भागांमधून काही विचित्र ध्वनी येत आहे, अशी जाणीव झाली. प्रारंभी त्याला या कारजवळ जाण्यास भीती वाटली. कारमध्ये विषारी साप तर नसेल, असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. त्याने धाडस करुन कारचा दरवाजा उघडला. आतले दृष्य पाहून त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
या जुन्या दुर्लक्षित कारमध्ये मधमाशांनी एक भले मोठे पोळे बनविल्याचे त्याला दिसून आले. हे पोळे इतके मोठे होते, की जवळपास पूर्ण कार त्याने भरुन गेल्यासारखी दिसत होती. या सर्व घटनेचे व्हिडीओ चित्रण करुन त्याने ते प्रसारीत केले असून ते असंख्य लोकांनी पाहिले आहे. मधमाजीतज्ञांच्या म्हणण्यानुसार मधमाशांना शांत, वर्दळ नसलेली आणि अंधारी जागा पोळे बनविण्यासाठी लागते. ही कार अनेक वर्षे उपयोगात नसल्याने पडून होती. तिचा चांगला उपयोग आसपासच्या मधमांनी केला. हे स्थान त्यांच्यासाठी आदर्श होते. त्यांनी त्वरित या कारचा ताबा घेतला आणि तिला आपले घर बनविले. त्यांनी बनविलेले पोळे इतके मोठे होते, ते काढण्यासाठी अनेकांचे साहाय्य घ्यावे लागले. या पोळ्यातून मधही मोठ्या प्रमाणात मिळाला. अशा प्रकारे पडून राहिलेल्या जुन्या कारमध्ये दडलेल्या या रहस्याचा भेद झाल्याचे दिसून येत आहे.