युवा संघातील दुसरी कसोटी अनिर्णीत
म्हात्रेचे शतक, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकली
वृत्तसंस्था/चेम्सफोर्ड (इंग्लंड)
यजमान इंग्लंड आणि भारत 19 वर्षांखालील वयोगटातील येथे सुरू असलेली दुसरी कसोटी अनिर्णीत अवस्थेत संपली. पाऊस आणि खराब हवामानामुळे भारतीय युवा संघाला संभाव्य विजय मिळविता आला नाही. उभय संघातील दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका अनिर्णीत राहिली तर भारतीय युवा संघाने इंग्लंडच्या दौऱ्यात वनडे मालिका 3-2 अशी जिंकली. भारतीय युवा संघाने दुसऱ्या डावात 43 षटकात 6 बाद 290 धावा जमविल्या. भारतीय युवा संघाला इंग्लंडने शेवटच्या दिवशी 65 षटकात 355 धावांचे आव्हान विजयासाठी दिले होते. पण भारताने दुसऱ्या डावात 43 षटकात 6 बाद 290 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार आयुष म्हात्रेने दमदार खेळ करत शतक (126) झळकविले.
आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 13.5 षटकात शतकी भागिदारी केली. पण मल्होत्रा बाद झाल्यानंतर कर्णधार म्हात्रेला कुंडुने चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 13 षटकात 117 धावांची भागिदारी नोंदविली. 26.3 षटकात भारताने 2 बाद 217 धावांपर्यंत मजल मारली होती. म्हात्रे बाद झाल्यानंतर भारताचे तीन फलंदाज केवळ 46 धावांत बाद झाल्याने भारताची स्थिती 6 बाद 263 अशी झाली होती. खराब हवामान आणि पावसामुळे भारताला विजय नोंदविता आला नाही. तत्पूर्वी इंग्लंड युवा संघाने बिनबाद 93 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि दुसरा डाव 5 बाद 324 धावांवर घोषित करुन भारताला विजयासाठी 355 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय युवा संघातर्फे आदित्य रावतने 4 गडी बाद केले. भारतीय युवा संघाच्या दुसऱ्या डावात कुंडूने 65 धावा जमविल्या तर इंग्लंड संघाच्या अल्बर्टने 76 धावांत 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 309, भारत प. डाव 279, इंग्लंड दु. डाव 5 बाद 324 डाव घोषित, भारत दु. डाव 43 षटकात 6 बाद 290 (आयुष म्हात्रे 126, मल्होत्रा 27, कुंडू 65, अल्बर्ट 4-76)