शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शिवजयंतीदिनी 19 फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन : जगदीश कदम यांची माहिती
पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला असून, येत्या शिवजयंतीच्या दिवशी (दि. 19 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील, अशी माहिती ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती देताना जगदीश कदम म्हणाले, या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एक भव्य स्वागत कक्ष, एखाद्या आधुनिक थीम पार्कला साजेल, असे टाईम मशीन थिएटर व तुळजा भवानी मातेचे भव्य मंदिर यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते, हेदेखील लोकांपर्यंत पोहोचवायला हवे, असे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते. त्यानुसार या टप्प्याची रचना करण्यात आली आहे. या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे 87 कोटी ऊपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असून, स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्त्वाची 3 तत्त्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
टाइम मशीन थिएटर एक पर्वणीच
यातील टाइम मशीन थिएटर शिवप्रेमींना एक पर्वणीच ठरेल. यामध्ये आपण सुमारे 1000 वर्षे मागे जातो व तिथून शिवाजी महाराजांच्या काळात येतो. यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्त्वाचे म्हणजे 360 अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर आहे. भव्य स्वागतकक्षात 4 टप्प्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीची प्रतिकृती (मॉडेल) ठेवण्यात आली असून, त्या त्या टप्प्याच्या नावासमोरील बटन दाबले असता तो टप्पा कशासंबंधी आहे व शिवसृष्टीत कुठे आहे, हे शिवप्रेमींना कळू शकेल. या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 6 मोठे पोर्ट्रेट्स लावण्यात आले आहेत. या पोट्रेट्सचे वैशिष्ट्या असे आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या या प्रिंट्स आहेत. यामध्ये ‘द हेग नॅशनल आर्काईव्हज व नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड्स’, ‘रिक्स म्युझिअम अॅमस्टरडॅम’, ‘ब्रिटिश म्युझिअम, लंडन’, बिल्बीओथेक नॅशनल पॅरिस व छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मुंबई येथील पेंटिंग्जचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सल्लागार संदीप जाधव व शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार उपस्थित होते.
लढायांची माहिती तीन भाषांमध्ये लिखित स्वरूपात
‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत खूप लढायांचे नेतृत्व केले. त्यातील आपल्याला फारशी माहिती नसलेल्या लढायांची माहिती येथे लिखित स्वरूपात मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये देण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले असणार आहे. मंदिर हे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून, अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगडदेखील सारखा आहे. येत्या 17 फेब्रुवारीला तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती मूर्तिशास्त्राचे अभ्यासक व तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडवण्यात आली असल्याचे जगदीश कदम यांनी सांगितले.