सर्वात जुन्या दुर्गाचा शोध
दुर्ग किंवा किल्ले पाहण्याचा छंद अनेकांना आहे. भारतात तर असे पुराणकालीन गड शेकडोंच्या संख्येने आहेत. मोठा इतिहास असणाऱ्या प्रत्येक देशात ते असतातच. दुर्गांमध्ये डोंगरी आणि भुईकोट असे दोन प्रकार साधारणत: असतात. त्यांच्यापैकी भुईकोट गड पूर्णत: मानव निर्मित असून ते भूमीवरच असतात, तर डोंगरी गड डोंगरांच्या नैसर्गिक उंचीचा आधार घेऊन निर्माण केलेले असतात. मात्र जगातील सर्वात जुना किंवा पुराणकालीन गड कोणता, हा वादाचा विषय आहे. साधारणत: 15 गडांची माहिती सर्वात जुना गड अशी दिली जाते. 
गडांची निर्मिती किमान 10 हजार वर्षांपासून होत आहे, असे दिसून येते. अनेक गड काळाच्या ओघात, भूमीच्या उदरात गडप झाले आहेत. अशाच एका गडाचा शोध दीड वर्षापूर्वी लागला आहे. हा जगाच्या इतिहासातील सर्वात जुना गड मानला जात आहे. हा गड सैबेरियाच्या हिमाच्छादित प्रदेशात 8 हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आला होता, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘अमन्या‘ असे नाव या गडाला जवळच्या नदीच्या नावावरुन देण्यात आले असून त्याची रचना तुलनेने आधुनिक काळातील गडांप्रमाणे मजबूत असल्याचेही आढळून आले आहे. हा दगडी गड असून त्याचे क्षेत्रफळ तीन ते चार एकर होते.त्या काळात मानवाने आजच्या इतकी तंत्रवैज्ञानिक प्रगती केली नव्हती. त्यावेळचा मानव शिकार आणि कंदमुळे तसेच फळे यांच्यावरच गुजराण करीत असे. पण त्याहीकाळात गडनिर्मितीचे जटील शास्त्र त्याला ज्ञात होते, हे या संशोधनावरुन स्पष्ट झाल्याने हे संशोधन महत्वाचे मानण्यात येत आहे. तसेच त्या काळातील सर्व मानवसमूह भटके नव्हते. ते गडासारखी संरक्षक रचना उभी करुन स्थिर जीवन जगत असत, हे देखील या संशोधनावरुन स्पष्ट झाल्याने पुराणकालीन जीवनशैलीसंबंधीच्या आजवरच्या अनेक समजुतींना तडा गेला आहे.
सैबेरियासारख्या दुर्गम भागातही इतक्या पूर्वीच्या काळात लोक तुलनेते आधुनिक आणि सुरक्षित जीवनशैली अनुभवत होते, हा महत्वाचा निष्कर्ष या दुर्गाच्या शोधामुळे काढता आला आहे. आठ हजार वर्षांपूर्वीही आपण समजतो त्यापेक्षा तंत्रवैज्ञानिक प्रगती अधिक होती, हेही यावरुन सिद्ध होत आहे. पुरातन जीवनशैली समजून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्वाचे मानण्यात येत आहे.