Sangli Crime : ... त्या महिलेचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरुच !
रसिका कदम हत्येप्रकरणात पोलिस तपास सुरु
ईश्वरपूर : येथील बहे नाका परिसरातील रसिका मल्लेश कदम (३५) या महिलेचा दुसऱ्या दिवशीही कृष्णा नदीपात्रात शोध घेण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. बुधवारी रात्री नदीपात्रात तिची दुचाकी मिळाली आहे.
अनैतिक संबंध व पैशाच्या कारणावरून वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील तुकाराम शंकर बाटेगावकर याने तिचा खून करून दुचाकीसह मृतदेह नदीपात्रात ताकारी जवळ फेकल्याची कबुली त्याने पोलीसांकडे दिली आहे. गेल्या काही वर्षापासून रसिका व तुकाराम यांच्यात संबंध होते. रसिका ही तुकारामकडे वारंवार पैशाची मागणी करीत होती.
त्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्यात वादावादी होत होती. हा बाद तुकारामच्या घरापर्यंत जावून रसिका हिचा बाद त्यांच्या पत्नी सोबत ही झाला होता. काही दिवसापूर्वी त्यावरुन तुकारामने रसिकाच्या घरी जावून भांडण केले. असल्याचे समजते.
बुधवारी सायंकाळी तुकाराम याने पैसे देतो, बोरगावला ये असे सांगून तिला बोलावून घेतले. दरम्यान त्याने तिचा काटा काढून मृतदेह व या महिलेची दुचाकी नदीपात्रात फेकून दिली. त्याची कुणकुण पोलीसांना लागल्याने त्यांनी तुकारामला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडूनच माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सांगलीची रेस्क्यू टीम बोलावून शोध मोहिम सुरु केली. ही मोहिम बुधवारी दुपारपासून सुरु आहे. बुधवारी सायंकाळी दुचाकी सापडली. पण अद्याप या महिलेचा सुगावा लागलेला नाही.