निष्ठेतूनच खेडकरांच्या हातून शिवाजी महाराजांचे शिल्प साकार
कोल्हापूर :
आपल्या कामावरील असीम निष्ठेमुळेच शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या हातून शिवाजी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे शिल्प तयार झाले, असे भावनिक उद्गार त्यांच्या कन्या तथा शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांनी येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा सुवर्णमहोत्सव दिन विद्यापीठात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
सीमा खेडकर-शिर्के म्हणाल्या, खेडकर यांनी मोठी मेहनत व चिकाटीने शिवाजी विद्यापीठातील या शिवशिल्पाचे काम केले. सुरवातीला त्यांच्याकडे काम देण्याविषयी साशंक असणाऱ्या लोकांनीही हे काम पाहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि खेडकर यांच्या एकमेकांशी सातत्यपूर्ण चर्चेतून हे शिवरायांचे देखणे शिल्प साकार झाले. त्यावेळी हा पुतळा आशिया खंडातला सर्वात मोठा म्हणून गणला गेला. ऊन, वारा, पाऊस झेलत गेली 50 वर्षे हा पुतळा दिमाखदारपणे उभा आहे, हेच खेडकर यांच्या शिल्पकलेचे मोठेपण आहे. आजच्या शिल्पकारांसाठी त्यांचे हे काम आदर्शवत स्वरुपाचे आहे. असे खेडकरांनी 500 हून अधिक पुतळे साकारले. विशेष म्हणजे 71 व्या वर्षी त्यांना अर्धांगवायू झाला. त्यानंतर सुद्धा त्यांनी एका हाताने 150 पुतळे साकारले. सन 2026 हे बी.आर. खेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने जानेवारी 2025मध्ये शिवाजी विद्यापीठात शिल्पकला कार्यशाळा भरविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार हे द्रष्टे कुलगुरू आणि महान इतिहासकार होते. त्यांच्या मनात छत्रपती शिवरायांची विशिष्ट छबी होती. ती या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांनी खेडकर यांच्याकरवी साकार करून घेतली. खेडकरांनीही जीव ओतून काम केल्याने मूर्तीमध्ये जिवंतपणा उतरला. हा पुतळा अखिल महाराष्ट्राचे वैभव आणि प्रेरणास्थान आहे. अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यासारख्या जाणकार इतिहासकाराची नजर आणि खेडकरांसारख्या कसलेल्या शिल्पकाराचे कसब यांचा संगम म्हणजे शिवछत्रपतींचा हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या उभारणीत कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा-वेदगंगा, कुंभी-कासारी, वारणा आणि पंचगंगा या पाच सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही हातभार आहे, तर परिसरातील नागरिकांनीही निधी दिला आहे. दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस या पुतळ्याचा अनावरण दिन म्हणून साजरा केला जाईल. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी संकलित व संपादित केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व लघुपटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सर्व अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.