टाकाऊ फुलांतून अगरबत्तीचा सुगंध
महापालिकेच्या प्रकल्पाला गती : संकल्पना जिल्हाभर राबविण्याचा अधिकाऱ्यांचा विचार
बेळगाव : शहरातील टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. त्यामुळे टाकाऊ कचऱ्यातील फुलांपासून अगरबत्तीचे उत्पादन सुरू झाले आहे. पर्यावरण प्रदूषण रोखण्याबरोबरच कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याला प्रतिसाद मिळत असून विविध मंदिरे आणि फूल लिलाव केंद्रांतून गोळा होणाऱ्या फुलांच्या कचऱ्यापासून सुगंधी अगरबत्ती तयार होऊ लागली आहे. अशोकनगर येथील फूल लिलाव केंद्रांतून दोन-तीन दिवसाआड 300 ते 500 किलो फुलांचा कचरा निर्माण होत आहे. याचा वापर आता अगरबत्ती तयार करण्यासाठी केला जात आहे. त्याचबरोबर विविध मंदीर परिसरात टाकण्यात आलेल्या फुलांचा वापर अगरबत्तीसाठी केला जात आहे.
ही संकल्पना आता जिल्ह्यातील विविध भागात राबविण्यासाठी अधिकाऱ्यांचा विचार सुरू आहे. फूल लिलाव केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. दरम्यान, विक्री न झालेली फुले जागेवरच टाकली जातात. या टाकाऊ फुलांपासूनच सुगंधी अगरबत्ती तयार केली जात आहे. यासाठी फूल केंद्रांमार्फत शेड आणि विजेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 28 हून अधिक जणांना रोजगार मिळाला आहे. फुलांपासून पावडर तयार करून हुक्केरीतील फॅक्टरीला पाठविली जात आहे. त्या ठिकाणी अगरबत्ती तयार केली जात आहे. शहरातील कपिलेश्वर मंदिर यासह इतर ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या फुलांचे संकलन केले जात आहे. या फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याला चालना दिली जात आहे. त्यामुळे मंदिरातील फुलांच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय टाकाऊ फुलांपासून होणारा कचरा आणि प्रदूषण रोखण्यास मदत होऊ लागली आहे.