विरोधकांचे डावपेच उधळणार सत्ताधारी!
पणजीतील बैठकीत सरकारची रणनीती : सत्ताधारी, मित्रपक्ष, आमदार, मंत्र्यांचा सहभाग
पणजी : येत्या 21 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी सरकारला कितीही घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी पणजीत सरकारने विशेष रणनीती आखली. भाजप सरकार हे जनतेचे सरकार आहे. त्यामुळे विरोधकांचे डावपेच उधळण्यास सरकार सक्षम आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर सांगितले. पणजी येथील हॉटेलात घेण्यात आलेल्या बैठकीला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर, कृषीमंत्री रवी नाईक, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, तसेच आमदार दिगंबर कामत, दाजी साळकर, संकल्प आमोणकर, केदार नाईक, ऊदाल्फ फर्नांडिस, गोविंद गावडे, प्रेमेंद्र शेट आदी उपस्थित होते.
मंत्री सुदिन ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. अधिवेशनात यंदा 15 दिवस कामकाज चालणार आहे. या कामकाजाविषयी सरकारातील घटक पक्ष व सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार हेही या बैठकीला उपस्थित होते. या पंधरा दिवसांत जनतेचे प्रश्न आणि सरकारने राबविलेल्या विविध योजना, विकासकामे याविषयी प्रामुख्याने चर्चा होईल. सरकारचे काही धोरणात्मक निर्णय अधिवेशनात जाहीर करण्यात येणार आहेत. सत्ताधारी आमदारांनी तसेच मंत्र्यांनी अधिवेशनात कोणत्या गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात आणि काय करावे, काय करू नये, याबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. खासगी ठराव आणि खासगी विधेयके सादर करण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे. विधेयके किती असतील आणि कोणत्या स्वऊपाची असतील, याची माहिती विधानसभा अधिवेशन कार्यकाळात नक्कीच दिली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
विरोधकांकडून उगीचच ओरड
गत विधानसभा अधिवेशन 18 दिवसांचे होते. त्यापैकी तीन दिवसांत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा त्यात झालेली आहे. हे विरोधकांनाही माहिती आहे, तरीही अधिवेशनाचा कार्यकाळ कमी केल्याची ओरड केली जात आहे. तीन दिवस अभिभाषणावर चर्चा झाल्याने ते तीन दिवस यंदाच्या अधिवेशनात कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदाचे अधिवेशन हे 15 दिवसांचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर सांगितले.
अधिवेशानंतर मंत्रिमंडळ विस्तार
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. परंतु आता पावसाळी विधानसभा अधिवेशन तोंडावर आलेले आहे. विधानसभा कामकाज झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
दामू नाईक यांच्याकडून पक्षशिस्तीचे धडे
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी झाली. या बैठकीतील निर्णय अथवा चर्चा ह्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचत असल्याने याविऊद्ध प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री व आमदारांना पक्षशिस्तीचे धडे दिले आहेत. कोअर कमिटीतील निर्णय हे बैठकीबाहेर जात असतील तर हे पक्षशिस्तीच्या विरोधी आहे. त्यामुळे भाजपचा कोणताही मंत्री किंवा आमदार एकमेकांविऊद्ध आरोप-प्रत्यारोप करणार नाहीत. शिवाय कोअर कमिटीतील निर्णय हे बाहेर जाता कामा नाहीत यासाठी पक्षशिस्तीला प्रथम प्राधान्य द्यावे, असा सल्ला दामू नाईक यांनी दिला असल्याचे सांगितले.