महर्षी वाल्मिकींचा आदर्श युवा पिढीने घ्यावा
जिल्हा प्रशासनातर्फे महर्षी वाल्मिकी जयंती : वाल्मिकींच्या साहित्यावर आणखी संशोधनाची गरज
बेळगाव : माणसातील माणूसपण टिकविण्यासाठी महर्षी वाल्मिकींची शिकवण आचरणात आणणे गरजेचे आहे. आजच्या युवा पिढीने महर्षी वाल्मिकींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुदृढ समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. त्यांच्या साहित्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे. जयंती केवळ आचरणासाठी असू नये. त्यांचे आचार-विचार प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात करण्यासाठी असावी, असे लक्ष्मणराव चिंगळे यांनी सांगितले.
उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यल्लाप्पा कोळेकर, जि. पं. चे उपसचिव बसवराज हेग्गनाईक, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, समाज कल्याण खात्याचे रामनगौडा कन्नोळी, साहित्यिक डॉ. सर्जू काटकर, मल्लेश चौगुले आदींसह वाल्मिकी समाजाचे नेते यावेळी उपस्थित होते.
हंपी कन्नड विद्यापीठाचे प्रा. वेंकटगिरी दळवाई यांचे व्याख्यान झाले. जगाला महाकाव्य दिलेला समाज वाल्मिकी समाज आहे. तरीही हा समाज पुढे येत नाही. या विषयावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुराणकाळापासूनही हा समाज आहे. जगात बेडर शूरवीरांपेक्षा श्रेष्ठ वीर कोणीही नाही, असे विलियम शेक्सपियर यांनी सांगितले होते. रामायण महाकाव्य समृद्ध काव्य आहे. रामायणात माणूस, वानर आणि राक्षसांचा परिचय आहे. आता वाल्मिकी रामायणाला धक्का पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. या कार्यक्रमापूर्वी किल्ला तलावापासून मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी चालना दिली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, मृणाल हेब्बाळकर, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बसवराज कुरीहुली आदी उपस्थित होते.