मच्छे औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता खड्डेमय
वाहनधारकांना धोकादायक : दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
मच्छे औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय बनला आहे. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीमधील या रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्यामुळे वाहनधारक, कामगार वर्ग आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मच्छे ते वाघवडे या रस्त्याची तर दयनीय अवस्था झालेलीच आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे रोज किरकोळ अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच मच्छे औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अशी अवस्था असल्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे मच्छे भागातील रस्त्यांच्या दुऊस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. मच्छे औद्योगिक वसाहतीमधून प्रशासनाला कर दिला जातो. मात्र या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये जाणाऱ्या कामगार वर्गाला मात्र खड्ड्यांच्या रस्त्यातून ये-जा करावी लागते. स्वामीनगरातील या औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी कारखान्याच्या मालकांकडूनही प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण स्थानिक नागरिकांना प्रशासन दाद देत नसेल तर उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास या रस्त्याची दुऊस्ती होऊ शकते.
खड्डेमय रस्त्यामुळे होत आहे दमछाक
मच्छे येथील स्वामीनगर ते इंडस्ट्रीयल विभाग मच्छे येथून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडून येणाऱ्या-जाणाऱ्यांची दमछाक होत आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. कारण मच्छे इंडस्ट्रीजला जाणारा बेळगाव तसेच खानापुरातून येणारा कामगार वर्ग हा याच रस्त्याचा उपयोग करतो व शाळेची मुलेसुद्धा शाळेसाठी जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करतात. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलून डागडुजी करावी.
- सागर कणबरकर, संभाजीनगर, मच्छे
खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार
स्वामीनगरातील नागरिकांना नेहमीच खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागतो. औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मुख्य रस्ता असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले असते. गेल्या दोन दिवसापासून पाऊस कमी झाला असल्यामुळे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे कामगार वर्ग या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करतो. प्रशासनाने या रस्त्याची दखल घेऊन त्वरित दुऊस्ती करावी.
- सुरज लाड, स्वामीनगर मच्छे