बेळगुंदी शिवारातील रस्ता हरवला चिखलात
रस्त्यावर गुडघाभर चिखल : रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेताकडे जायचे कसे, बळीराजा चिंतेत
वार्ताहर /किणये
बेळगुंदी गावातील शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल झाला आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून शिवाराकडे जायचे कसे, याची चिंता या गावातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहे. या चिखलमय रस्त्यावरून ऐन खरीप हंगामात शिवारात जाणे मुश्किल झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बेळगुंदी गावातील गावडे गल्लीच्या शेवटच्या टोकाकडील लोहार खिंडीपासून शिवारातून मार्कंडेय नदीपर्यंत हा रस्ता गेला आहे. गावातील नागरिक या रस्त्याला ‘गुरवाळ रस्ता’ असे म्हणतात. सध्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाय घसरून पडल्याने काही शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत.
प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बेळगुंदी येथील शिवाराकडे जाणाऱ्या गुरवाळ रस्त्यासाठी प्रशासनाची योजना व निधी मंजूर होत नाही का? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. सध्या भात रोप लागवडीचा हंगाम जोमाने सुरू आहे. भात रोप लागवड करण्यासाठी शिवारापर्यंत बैलगाडी, ट्रॅक्टर अथवा दुचाकी जाणे गरजेचे आहे. सध्या रस्त्याची परिस्थिती पाहता बैलगाडी, ट्रॅक्टर व दुचाकी जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना शिवारात भात रोप, खत, आदी घेऊन जाणे अवघड बनले आहे.
बेळगुंदी गावातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दोन चार दुभती जनावरे पाळतात. या जनावरांसाठी या गुरवाळ रस्त्यावरूनच ओला चारा आणावा लागत आहे. डोक्यावरून चारा आणताना काही शेतकरी घसरुन पडलेले आहेत. गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्याच्या दुतर्फा आहेत. त्यामुळे उन्हाळा व पावसाळ्यात या रस्त्यावरून शेतकऱ्यांना रोज ये-जा करावी लागते. चिखलात हरविलेल्या या रस्त्याची पाहणी करून ग्रामपंचायतीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीने निधी मंजूर करून रस्ता तयार करावा
शेतवडीकडे जाणाऱ्या या गुरवळ रस्त्यावर चिखल पसरल्याने चालत जाणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे आता शेताकडे जायचे कसे आणि शेती कशी करावी, हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. गेल्या पंधरा वर्षापूर्वी ग्राम पंचायतीकडून कच्च्या स्वरुपाचा रस्ता करण्यात आला होता. मात्र एक दोन वर्षात रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता खराब झाला होता. मागील पाच वर्षापूर्वी आम्ही 7 शेतकऱ्यांनी मिळून श्रमदानातून या रस्त्यावर मुरुम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली होती. यावेळी गावातील 22 टॅक्टर मदतीसाठी आले होते. सध्या मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. ग्राम पंचायतीने या रस्त्यासाठी निधी मंजूर करून रस्त्यांचे डांबरीकरण करायला हवे. तरच इथल्या बळीराजाला शेती करणे सोयीस्कर ठरणार आहे.
- नामदेव गुरव, शेतकरी