रेड्याची टकरी ते एनसीसी भवन मार्गावरील रस्त्याची चाळण
कोल्हापूर :
रेड्याची टकरी ते एनसीसी भवन या मार्गावर रस्त्यावर मोजता येणार नाहीत ऐवढे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने तळयाचे स्वरूप आले आहे. महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही महापालिका जाणीवपुर्वक या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे.
रेड्याची टकरी ते एनसीसी भवन या रस्त्यावरून केएमटी चार्जिंक स्टेशनची विद्युत पाईपलाईन आणण्यासाठी काही महिन्यापुर्वी रस्त्याची खुदाई केली होती. खुदाई केलेले खड्डे पाऊस सुरू झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी बुजवले आहेत. परंतू खड्डे बुजवून आजून पंधरा दिवस झाले नाही तोपर्यंत पावसाने या खड्ड्यातील खडी वाहून गेल्याने पुन्हा जैसे थे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. खड्ड्यात एखादी गाडी गेली तर त्या खड्ड्यातील पाणी आसपासच्या लोकांच्या अंगावर उडते. परिणामी पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांच्या पाठीची हाडे खिळखिळा होत असल्याचे चित्र असून, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांच्या पाठीचे आजार वाढत आहेत. गाडी चालवताना उड्याच माराव्या लागतात, त्यामुळे पुढे गाडी पडते की काय अशी भिती दुचाकीस्वारांच्या मनात असते. ऐवढेच नाही तर अनेक गाड्या खड्ड्यात जावून पडल्या आहेत. यावरून रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे, हे निदर्शनास येते.
रेड्याची टकरी ते एनसीसी भवन हा रस्ता गेल्या दहा वर्षापुर्वी केलेला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. तरीही स्थानिक लोकनेत्यांसह महापालिका प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नाही. शिवाजी विद्यापीठात जाणारे लोक याच रस्त्याने ये जा करतात. तसेच राजेंद्रनगर, सम्राटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जागृतीनगर आदी उपनगरातील नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा असूनही या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तसेच वि. स. खांडेकर प्रशाला, चुनेकर हायस्कूल, शिवाजी विद्यापीठ या शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना याच रस्त्याने वाट शोधत खड्डे चुकवताना उड्या मारतच जावे लागते. रेड्याच्या टकरी येथील खाऊ गल्लीत आलेले खवेय्ये आर्धा रस्त्यापर्यंत उभारलेले असतात. त्यामुळे सायंकाळी येथून जाणाऱ्या वाहनधारकांना गाडी कशी पुढे घेवून जायची असा प्रश्न पडतो. किंवा एखादा नागरिक अचानक पुढे आला तर अर्जंट ब्रेक लावल्याने अनेक गाड्या स्लिप झाल्या आहेत. एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे नागरिकांची वर्दळ याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
- महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी
नागरिकांनी खराब रस्त्याची तक्रार दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पुढच्या आठ दिवसात पुन्हा रस्त्यावर जैसे थे खड्डे असतात, मग रस्त्याची दुरूस्ती काय केली? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्यावर मुरूम आणि खडी टाकली तर त्यावर डांबर टाकले नसल्याने हा मुरूम वाहून गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
- गरज नसताना रस्त्यावर कशाला तीन गतीरोधक
रेड्याची टकरी परिसरात तीन गतीरोधक आहेत. त्यापैकी दोन गरीरोधकला लागूनच खड्डे पडल्याने गतीरोधक आणि खड्ड्यामुळे गाड्या स्लिप होवून अनेक वाहनधारकांचा आपघात झाला आहे. एका तर गतीरोधकावर तीनवेळा गाडी वरखाली होत असल्याने अनेक महिलांना गाडी न आवरल्याने आपघात झाल्याची उदाहरणे आहेत. हा गतीरोधक कारण नसताना केल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
- दोन नगरसेवकांच्या सीमेवरचा रस्ता
रेड्याची टकरी ते एनसीसी भवनचा रस्ता प्रतिभानगर आणि सम्राटनगर परिसरातील नागरिकांच्या बाँड्रीवर आहे. त्यामुळे मी का करून यामध्ये दोन्ही नगरसेवकांकडून या रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव महापालिकेकडे गेलेला नाही. दोन्ही नगरसेवकांच्या वादात स्थानिक नागरिकांसह ये जाकरणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची दुरूस्ती होईल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.