For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नद्यांच्या काठी पुराचा फास आवळलेलाच

12:12 PM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
नद्यांच्या काठी पुराचा फास आवळलेलाच
Advertisement

वाढत्या पाणीपातळीने वाढली चिंता :  आलमट्टीतून पाण्याचा विसर्ग 3 लाख क्युसेक

Advertisement

वार्ताहर/एकसंबा

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कृष्णा व दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढच होताना दिसत आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठी पुराचा फास आवळलेलाच दिसून येत आहे. पाणीपातळी कमी होईल अशी शक्यता होती, मात्र धरणातील विसर्ग आणि कृष्णा नदीस सामावणाऱ्या नद्यांमध्ये पाणी वाढतच आहे. कृष्णा नदीची पातळी 0.3 मीटर तर दूधगंगा नदीची पातळी द. 14 मीटरने वाढली आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे पूरग्रस्त भागातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्याची परिस्थिती पाहता नदीकाठी चिंता वाढली आहे.

Advertisement

सोमवारी राजापूर बंधाऱ्यातून 13 हजार 416 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढून 2 लाख 43 हजार 599 इतका होता. दूधगंगा नदीतून 1050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढून 48 हजार 570 क्युसेक इतका होत होता. तर कल्लोळ कृष्णा नदीपात्रात 14 हजार 446 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढून 2 लाख 92 हजार 169 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत होता. कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून 2 लाख 40 हजार क्युसेकने विसर्ग होत असेल तर कृष्णा इशारा पातळी ओलांडते. तर 2 लाख 90 हजार क्युसेक विसर्ग होत असल्यास धोका पातळी गाठते. सध्या राजापूर बंधाऱ्यातून 2.43 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून कृष्णा नदीची वाटचाल धोका पातळीकडे जात आहे.

तर दूधगंगा धोका पातळी जवळ आली आहे. कृष्णा नदीची धोका पातळी 537 मीटर असून सोमवारची पाणीपातळी 536.14 मीटर इतकी होती. दूधगंगा नदीची धोका पातळी 538 मीटर असून सोमवारची पाणीपातळी 537.740 मीटर इतकी होती. रविवारच्या तुलनेत सोमवारी पाण्याची पातळी वाढली आहे. कल्लोळ येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आले आहे. तर येडूर येथील यात्री निवास व मंदिर परिसरात पाणी वाढले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे कृष्णा व दूधगंगा नद्यांचे पाणी आणखी विस्तारत आहे. वाढती पाणीपातळी प्रशासनास व नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना धडकी भरणारी ठरत आहे.

Advertisement
Tags :

.