कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर फेकण्याचा धोका वाढतोय

03:27 PM Jun 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

पावसाळा सुरू होताच शहरात नाले तुंबण्याची समस्या उग्र स्वरूप धारण करते. नुकत्याच महापालिकेने उचललेल्या 18,000 टन गाळामध्ये तब्बल 6,000 टन प्लास्टिक सापडले. या प्लास्टिक कचऱ्यामध्ये फेकलेले सॅनिटरी नॅपकिन मोठ्या प्रमाणावर आढळले. हे केवळ स्वच्छतेचे नव्हे, तर आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर संकट निर्माण करणारे आहे.

Advertisement

सॅनिटरी नॅपकिन महिलांच्या मासिक पाळी दरम्यान अत्यंत उपयुक्त असले तरी त्याचा निपटारा योग्य पद्धतीने न केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अनेक महिलांना अजूनही वापरलेले नॅपकिन प्लास्टिक पिशवीत गुंडाळून रस्त्यांवर, नाल्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकण्याची सवय आहे. ही परिस्थिती अशी आहे की, जणू शहराने “स्वच्छता’ हा शब्द केवळ बॅनरवर ठेवला आहे आणि प्रत्यक्षात कचऱ्याचा डोंगर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात उभा राहिला आहे. सॅनिटरी नॅपकिनमुळे निर्माण होणारे परिणाम हे ठहसतमुख चेहऱ्यावर आलेल्या गुप्त रोगासारखे आहेत. दिसत नाहीत, पण आतून शरीराला पोखरत असतात.

सॅनिटरी नॅपकिन हे अनेकदा जैविक आणि प्लास्टिक मिश्रित असतात. त्यामध्ये शोषलेल्या शरीरस्रावामुळे त्यावर जंतू आणि विषाणूंची वाढ होते. हे नॅपकिन नाल्यात, मोकळ्या जागी किंवा पावसाच्या पाण्यात मिसळतात, तेव्हा ते शुद्ध पाण्याचे स्रोत दूषित करतात. या नॅपकिनमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे आजारांचा धोका प्रचंड वाढतो. यामध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊ शकतो. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या टायफॉईड, कॉलरासारख्या पचनसंस्थेच्या जीवघेण्या विकाराचा धोका आहे. लहान मुलांना किंवा झोपडपट्टी भागात राहणाऱ्यांना त्वचेवर जंतुसंसर्ग होतो. हिपॅटायटिस ए आणि ई दूषित पाणी किंवा अन्नाच्या संपर्कातून यकृत विकार पसरले जाऊ शकतात. विशेषत: महिलांमध्ये फंगल इन्फेक्शन आणि यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही, तर प्रत्यक्षात आपल्या आरोग्यावर आघातही होतो.

सॅनिटरी नॅपकिनचा रस्त्यावर पडलेला प्रत्येक तुकडा म्हणजे एका गुप्त रोगाचा स्फोटक झोत आहे. जो कुठल्याही क्षणी आजाररूपी संकट उडवून देऊ शकतो. हे नॅपकिन नाल्यात अडकतात. गाळात मिसळतात आणि त्यातून संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त व रोगजन्य बनतो. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर बनते. त्यामुळे प्रत्येक सॅनिटरी नॅपकिन हे एकप्रकारे प्लास्टिकचा स्फोटक बॉम्ब आहे, जो शहराच्या आरोग्यावर दहशत निर्माण करत आहे. नालेसफाईदरम्यान सापडलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले आहे.
दोषी कोण ? समाज, प्रशासकीय व्यवस्था की दोघही !

महिलांनी वापरलेले सॅनिटरी नॅपकिन सार्वजनिक ठिकाणी फेकणे ही एक सामाजिक उदासीनता दर्शवते. शिक्षणाची कमतरता, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, आणि सुविधांची टंचाई यामुळे ही सवय निर्माण झाली आहे. त्यामुळे यामध्ये दोषी कोण ? समाज , की जनजागृतीमध्ये पिछाडीवर असलेली प्रशासकीय व्यवस्था की दोघेही ... हा प्रश्न या ठिकाणी प्राधान्याने उपस्थित होत आहे.

महानगरपालिकेने शहरात सर्व ठिकाणी सॅनिटरी डिस्पोजल यंत्र बसवलेले नाहीत. सार्वजनिक शौचालयांमध्ये नॅपकिन डिस्पोजलचे पर्याय नसल्याने महिलांना पर्यायी मार्गच नाही. त्यामुळे सार्वजनिक शौचालये, शाळा, बसस्थानक अशा ठिकाणी यंत्र बसवणे अत्यावश्यक आहे.

- प्रशिक्षण व जनजागृती: महिलांना योग्य पद्धतीने नॅपकिन टाकण्याबाबत शाळा, महिला मंडळे, आरोग्य केंद्रांद्वारे प्रशिक्षण आवश्यक

- सॅनिटरी डिस्पोजल यंत्र : सार्वजनिक शौचालये, शाळा, बसस्थानक अशा ठिकाणी यंत्र बसवणे बंधनकारक करावे.

- घनकचरा व्यवस्थापन: नॅपकिनसाठी स्वतंत्र गोळा करण्याची आणि विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी.

- कडक दंडात्मक कारवाई: सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्रायांवर दंड लावणे.
-
जैवविघटनशील नॅपकिनचा वापर: पर्यावरणपूरक नॅपकिनसाठी प्रोत्साहन देणे.

प्रत्येक सॅनिटरी नॅपकिन चुकीच्या ठिकाणी फेकणे म्हणजे एका आजाराच्या बियाण्याची पेरणी आहे. स्वच्छतेच्या लढाईत आपण निक्रिय राहिलो, तर पुढील पावसाळे आपल्या अंगणात आजारांचे तांडव घडवतील. स्वच्छता ही केवळ महापालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आता वेळ आहे ‘मी स्वच्छ ठेवतो, मी जबाबदार आहे‘

                                                        कृष्णा पाटील, सहाय्यक आयूक्त, कोल्हापूर महानगरपालिका

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article