For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ठरतेय गंभीर समस्या

12:00 PM May 29, 2025 IST | Radhika Patil
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ठरतेय गंभीर समस्या
Advertisement

कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :

Advertisement

शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरी भागातील गल्ली-बोळात कुत्र्यांचे कळपच्या कळप वावरत आहेत. शहराच्या उपनगरांमध्येही कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत. रात्री अपरात्री या कुत्र्यांच्या भूंकण्याने लोकांची झोपमोड होत आहे. कोणतरी हूसकावल्याशिवाय ही कुत्री संबधित भागतून जात नाहीत, अशी वस्तूस्थिती आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या, अनियोजित शहरीकरण आणि अपुरी सार्वजनिक सुविधा यांच्या पाठीमागे अजून एक गंभीर समस्या उभी राहत आहे ती म्हणजे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या. रस्त्यावर फिरणारी ही कुत्री नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करीत आहेत. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. शहरात वाढलेली कुत्र्यांची संख्या नगरपालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, शहरात अंदाजे 8 ते 10 हजार आहेत. यातील अनेकांना कोणतेही लसीकरण झालेले नाही, तसेच त्यांच्यावर कोणतीही आरोग्यविषयक नियंत्रणाची उपाययोजना केलेली नाही. परिणामी, रेबीजसारख्या रोगांचा धोका अधिक वाढतोय.

Advertisement

  • नागरिक त्रस्त लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रामुख्याने वसाहती, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि शाळा परिसरात अधिक जाणवतो. सकाळी शाळेत जाणारी मुले, व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक, रस्त्यावर चालणारे वृद्ध यांना भटक्या कुत्र्यांपासून सतत सावध राहावे लागते. अनेक वेळा कुत्र्यांच्या टोळक्यांनी अचानक पाठलाग केल्यामुळे नागरिक जखमी झाले आहेत.

  • कुत्र्यांच्या वाढीमागील कारणे

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे उरलेले अन्न रस्त्यावर फेकणे, मोकळ्या ठिकाणी कचरा टाकणे, काही नागरिकांकडून कुत्र्यांना चक्क नियमित अन्न पुरवले जाते. यामुळे कुत्र्यांना शहरात सहज अन्न मिळते आणि त्यांची संख्या वाढते. त्याचबरोबर कुत्र्यांचे निर्बंध नसणे, नसबंदीची अपुरी अंमलबजावणी आणि जनजागृतीचा अभाव हीदेखील कारणे आहेत.

  • प्रशासनाची उपाययाजना पडतेयं अपुरी

महानगरपालिका प्रशासनाकडून काही प्रमाणात कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणाच्या मोहिमा राबवण्यात येत आहेत. मात्र ही उपाययोजना फारच अपुरी आणि मर्यादित स्वरुपात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुत्र्यांना पकडण्यासाठी मोजकेच कर्मचारी, अपुरा वाहन ताफा आणि कुत्र्यांवरील उपचारासाठी असलेली तोकडी सुविधा यामुळे कामकाज संथगतीने चालते.

  • प्रवासी व रुग्णालय क्षेत्रातील समस्याही गंभीर

रेल्वे स्टेशन, बसस्थानके तसेच रुग्णालयांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरतोय. काही घटनांमध्ये रुग्णवाहिकेचा मार्ग अडवला गेल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे आपत्कालीन सेवा पुरवण्यात अडथळा निर्माण होतो.

  • प्राणिप्रेमींनीही घ्यावी जबाबदारी

भटक्या कुत्र्यांप्रती सहानुभूती बाळगणं चुकीचं नाही. मात्र त्यांना मदत करताना सार्वजनिक सुरक्षेचा विचार करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. काही प्राणीप्रेमींनी विशिष्ट भागात कुत्र्यांना अन्न देण्याची व्यवस्था आखून ठेवली आहे. अशा प्रयत्नांचं कौतुक करताना, अधिक सुस्थितीने हे उपाय राबवणं गरजेचं आहे.

  • उपाययोजना काय असाव्यात?

नसबंदी मोहिमेचा विस्तार: शहरात कुत्र्यांची नसबंदी मोठ्या प्रमाणात व सातत्याने केली गेली पाहिजे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा व निधी आवश्यक आहे.

लसीकरण आणि आरोग्य तपासणी: कुत्र्यांचं लसीकरण नियमितपणे होणं गरजेचे आहे. त्यामुळे रेबीससारख्या रोगांचा धोका कमी होईल.

कचऱ्यावर नियंत्रण: कुत्र्यांना अन्न मिळणार नाही यासाठी कचऱ्याची नीट व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे.

प्राणी संरक्षण केंद्रे: शहराच्या बाहेर अशा कुत्र्यांसाठी तात्पुरती संरक्षण केंद्रे उभारावीत.

प्रबोधन व जनजागृती: नागरिकांना योग्य पद्धतीने जनजागृती करून कुत्र्यांच्या समस्येबाबत जागरूक करणे गरजेचे आहे.

  • सर्वानी एकत्र येत या आव्हानाला सामोरे जावे लागेल

भटक्या कुत्र्यांची समस्या ही फक्त कुत्र्यांची नसून ती सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता आणि शहरी व्यवस्थापन यांच्याशी संबंधित आहे. यासाठी प्रशासन, प्राणीप्रेमी आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत हे आव्हान सामोरं जावं लागेल.

                                                                                                           अनिल चौगले, कार्यवाह, निसर्गमित्र संस्था, कोल्हापूर.

  • महापालिकेने पाळीव प्राण्यांसाठी नियमावली राबवणे गरजेचे

नूकताच आर.के नगर येथे पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एक मुलगा जखमी झाला आहे. शहरात श्वान पाळण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये विविध जातीची कुत्री पाळली जातात. काही कुत्र्यांच्या जाती या अतिशय हिंवसक असतात. भारतामध्ये पिटबूल सारख्या प्रजातींना बंदी असून कोल्हापूर शहरामध्ये काहींच्याकडे या जातीची कुत्री पाळली जातात. अनेकजण ही कुत्री गार्डनमध्ये घेउढन फिरतात त्यामुळे अशी आक्रमक असणारी कुत्री लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्यावर हल्ला करण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेउढन पाळीव प्राण्यांसाठी नियमावली करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. अन्यथा भविष्यात खूप अडचणींचा सामना करावा लागेल.

Advertisement
Tags :

.