Vari Pandharichi 2025: भक्तिरसात न्हाले रिंगण
पंढरपूर / विवेक राऊत :
आसमंत व्यापून टाकणारा टाळ-मृदंगाचा गजर, माउली... माउली.., नामाचा अखंड जयघोष... अशा भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात वाखरी येथे सर्वांत मोठा म्हणून ओळखला जाणारा रिंगण सोहळा शुक्रवारी पार पडला. वाखरीच्या उभ्या आणि गोल रिंगणात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. माउलीचे पालखी सोहळयातील शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ संपन्न झाले. तर दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण उत्साहात पार पडले. दरम्यान, आज म्हणजे शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत.
विठोबा मला मूळ धाडा ।
धालत येईल दुडदुडा ।।
चरणी लोळेन गडबडा ।
माझा जीव झाला वेडा ।।
अशी झालेली अवस्था आणि अवघ्या महाराष्ट्रातून आलेला वैष्णवांचा दळभार, संतांच्या मांदियाळीत आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या आणि शेवटच्या गोल रिंगणानंतर रात्री वाखरी तळावर मोठ्या वैभवी थाटात विसावला.
भंडीशेगाव येथे आज सकाळी पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते पहाटपूजा झाली. दुपारी एक वाजता निघायचे असल्याने वारकरी भजन, कीर्तनात दंग होते. दुपारी सर्व संतांचे पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर माउलींचा सोहळा दुपारी एक नंतर निघाला. राजाभाऊ, रामभाऊ, सार्थक, वेदांत चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. बाजीराव विहिरीजवळ उभे आणि नंतर गोल रिंगण झाले. दरम्यान, अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. रिंगण मैदान विस्तीर्ण असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. चिखलात लोळतही वारकरी भजन करीत होते.
उडीसाठी चोपदारांनी निमंत्रण दिल्यानंतर माउलींच्या सभोवती सर्व टाळकऱ्यांनी भजनाला सुऊवात, टाळाचा नादब्रह्म ऐकून लाखो वारकरी मंत्रमुग्ध झाले होते.
ज्यांच्या भेटीसाठी गेली अठरा ते वीस दिवस, ऊन, वारा पाऊस, व्यवस्था, अवस्था यांचा कोणताही विचार न करता अखंड चाललेली वाट ते पंढरपूर हाकेच्या अंतरावर आल्याने वारकरी झपाझप पावले टाकत पंढरीकडे मार्गस्थ होत होते. ढगाळ वातावरणामुळे वारकरी उत्साहात वाटचाल करीत होते.
‘भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद’ अशा अवस्थेत सोहळा वाखरी तळावर आला. सर्व प्रमुख संतांचे पालखी सोहळे वाखरी तळावर असल्याने वारकऱ्यांनी पालख्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावर्षी सोहळ्यात प्रचंड गर्दी आहे.
- तुकोबारायांचे उभे रिंगण
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयातील उभे रिंगण बाजीरावची विहीर येथे रंगले. पंढरपूरपासून मोजक्याच अंतरावर असणाऱ्या तुकोबांच्या या रिंगण सोहळ्याकरता वारकऱ्यांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. आधी पताकाधारी, त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला वारकरी, पखवाजवादक आणि वीणाधारी यांनी रिंगणात फेरी पूर्ण केली. त्यानंतर चोपदाराचा अश्व आणि तुकोबांचा अश्व यांनी रिंगण वेगात पूर्ण केलं. तुकाराम, तुकाराम असा जयघोष करीत हा सोहळा वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
- कांदे नवमी साजरी
1. वारकरी दशमी, एकादशी, द्वादशी असे तीन दिवसांचे व्रत करतात. एकादशी पासून चातुर्मास सुरू होत आहे. या चार महिन्यांत कांदा, लसूण खाल्ले जात नाही. त्यामुळे आजचा शेवटचा दिवस कांदा खाण्याचा म्हणून या दिवसाला कांदे नवमी म्हणतात. त्यामुळे अनेक दिंड्यांमधून आज कांदा भजी आणि इतर कांद्याच्या पदार्थांचा बेत जेवणात होता.
- बाजीराव विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व
आयताकृती,भली मोठ्ठी बाजीराव दगडी विहीर आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकर यांनी ही विहीर बांधली. याच ठिकाणी उभे रिंगण गोल रिंगणाचा सोहळा असतो. यामुळे बाजीराव विहीर ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनली.