भात आलंय कापणीला... वरुणराजा कोपलेला!
परतीच्या पावसाचा जोर, भात कापणीला विलंब : हवामानातील बदलामुळे बळीराजा चिंताग्रस्त
वार्ताहर/किणये
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी अन्न पिकविणारा हा बळीराजा आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभाव व योग्य हमीभाव या चक्रव्युहात बळीराजा सापडलेला पहावयास मिळतो. सध्या तालुक्यात भातपीक कापणीला आले आहे. मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कापणीला आलेले भातपीक खराब होऊ लागले आहेत. तर काही ठिकाणची भातपिके पावसामुळे आडवी झाली आहेत. यामुळे ‘भात आलंय कापणीला आणि वरुणराजा कोपलेला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यातही तालुक्यात खरिप हंगामात विविध प्रकारची पिके घेण्यात येतात. भात हे तालुक्यातील प्रमुख पीक आहे. वर्षभर शिवारात काबाडकष्ट करून सुगी हंगामात पिकांची काढणी व कापणी करण्यात येते. यंदा मात्र ऐन सुगी हंगामाच्या कालावधीतच परतीचा पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे भात पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे भात कापणीची कामे खोळंबलेली आहेत. दरवर्षी दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर भात कापणीला सुरुवात करतात. यंदा ऐन दिवाळीत व त्यानंतरही परतीचा पाऊस सुरुच आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली नाही. कापणीसाठी भातपिके सज्ज झाले आहेत.
सतत होत असलेल्या या परतीच्या पावसाने भाताची लोंबे खराब होऊ लागली आहेत. यामुळे भात पिकांच्या उताऱ्यात नक्कीच घट होणार आहे, याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे. गेल्या दहा, बारा दिवसापासून तालुक्यात परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. गुरुवारी पावसाने थोड्या प्रमाणात उघडीप दिली होती. मात्र पुन्हा शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरुच होता. तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामानातही कमालीचा बदल झालेला आहे. त्यामुळे पुन्हा तालुक्यात पुन्हा मान्सून सुरू झाला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी, बासमती, सोनम, मधुरा, सोना मसुरी, भाग्यलक्ष्मी, चिंटू, सौभाग्यवती, शुभांगी, सुपर सोनम, अपुंर सोनम, एमपी, मिनाक्षी, इंटाणा, दप्तरी, कुमूद आदी जातीची भातपिके तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहेत. धूळवाफ, पेरणी व रोप लागवड करण्यात आली आहे.
यंदा जोरदार मान्सून झाला. या कालावधीत शिवारातील भातपिके पाण्याखाली गेली होती. यामुळे काही गावातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. जून महिन्याच्या मध्यानंतर व जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी शिवारात भातरोप लागवड केली. या भातपिकामध्ये खताचा डोस व भांगलण करण्यात आली. मध्यंतरी भात पिकांवर करपा रोग व कीडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी केली. सध्या भातपिके बऱ्यापैकी बहरुन आली आहेत. भात पिकांना लोंबे पोसवून आली आहेत. भाताचा रंग पिवळा झालेला आहे. बहुतांशी शिवारात भातपिके कापणीला आली आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे ही कापणी खोळंबली आहे. इंद्रायणी व विविध प्रकारची भातपिके पावसामुळे आडवी झाली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात नाचणा लागवड करण्यात आली आहे. या नाचणी पिकाला बऱ्यापैकी कणसे धरली आहेत. पण पावसामुळे नाचणा पीक जमिनदोस्त होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी शिवारात भुईमूगची पेरणी केली आहे. पावसामुळे भुईमूग व बटाटा काढणी कामे लांबणीवर पडली आहेत. तर सध्या होत असलेल्या पावसातही पश्चिम भागातील काही शेतकरी रताळी काढण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय बनला आहे. पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वारेमाप खर्च करावा लागतो. निसर्गाने साथ दिल्यास व उत्पादन बऱ्यापैकी आल्यास आणि या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळाल्यासच शेती परवडणारी ठरणार आहे. कृषी खात्यामार्फत युवा वर्गाला मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. तसेच सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
भातपीक एकरी खर्च...
- ट्रॅक्टर नांगरण 500 रुपये
- शेणखत एक ट्रॉली 4000
- भात बियाणे (रोपासाठी) 20 किलो 1600
- मशागत पॉवर ट्रिलर 700
- मशागत बैलजोडी 1500
- रासायनिक खत दोन पिशव्या 3300
- कोळपणी 1500
- भांगलण 3500
- औषध फवारणी 800
- भात रोप लागवड मजुरी......(20 जण) 5000
- भात कापणी मजुरी (10 जण) 3000
- मळणी ट्रॅक्टर भाडे व मजुरी 5000
- एकूण खर्च 30,400
‘वरुणराजा पुरे कर’- बळीराजाची आर्त हाक
सध्या निसर्गाचे चक्र बदलेले पहावयास मिळत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरिप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर उदरनिर्वाह असतो. खरिप हंगामातील ऐन सुगीच्या हंगामाच्या कालावधीत परतीचा पाऊस पडू लागला आहे. यामुळे भात कापणीसह शिवारातील अन्य कामे ठप्प झाली आहेत. भातपीक पावसामुळे खराब होऊ लागली आहेत. अशीच पावसाची परिस्थिती राहिल्यास सर्रास भागातील भातपिके पूर्णपणे आडवी होऊन पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे. तसेच भाताची लोंबे पावसामुळे काळसर होणार आहेत. ‘वरुणराजा पुरे कर’अशी आर्त हाक आम्हा शेतकऱ्यांना मारावी लागत आहे.
-आर. के. पाटील, वाघवडे
