भात कोळपणीच्या हंगामाची लगबग
येळ्ळूर परिसरातील चित्र : उगवण विरळ झाल्याने रोपलावणीसाठी तरु टाकण्याचे काम जोमात
वार्ताहर/येळ्ळूर
मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे भात पेरणी गडबडीत झाली असली तरी, येळ्ळूर शिवार व परिसर आता हळूहळू हिरवागार होताना दिसत आहे. पावसाच्या उघडझाप वातावरणामुळे भात कोळपणीचा हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची शिवारात झुंबड उडाली असून, सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेतकरी कोळपणी करतानाचे चित्र आहे. त्यातच रविवार सुटीच्या दिवसाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी शेतकरी कामगारवर्गासह शालेय विद्यार्थ्यांनाही मदतीला घेतल्याचे चित्र दिसते आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्याने फुटलेले कोंब व बी कुजते की काय या चिंतेत शेतकरी असताना पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व मशागत करावी लागल्याने उगवणी विरळ झाली आहे. त्यासाठी रोप लावणीसाठी तरवा टाकून लावणीची पुढील तजवीज केल्याचे चित्र वाफ्यातून दिसते आहे. विरळ उगवणीला कोळपणीबरोबर खताची मात्रा देणेही सुरू आहे.
सोले (पत्ताडे) बीज घालण्यासाठी धावफळ
महिला वर्गाचीही येळ्ळूरचा प्रसिद्ध ब्रँड असणाऱ्या सोले (पत्ताडे) याचे बीज उगवत घालण्यासाठी बांधाबांधावर त्यांची धावफळ सुरू आहे. याची उगवण व वाढ मोठ्या पावसाआधी होणे गरजेचे असल्याने महिला वर्ग या कामात गर्क आहे. एकंदरीत सहकुटुंब, सहपरिवार शेतकरी वर्ग शेतात राबतानाचे चित्र येळ्ळूरसह परिसरात दिसत आहे.
खत दुकानात गर्दी
यावेळी खताची चणचण न भासता त्याचा पुरवठा सुरळीत होत असल्याने शेतकऱ्यांची धावपळीपासून सुटका झाली आहे. मात्र खत खरेदीसाठी सकाळ-संध्याकाळी शेतकरी वर्ग खताच्या दुकानात गर्दी करताना दिसतो आहे.