भातपीक चांगले, पण निसर्ग साथ देईल का?
पीक परिपक्वतेच्या वाटेवर असून दिवाळी दरम्यान सुगीला सुरुवात होण्याचा अंदाज
येळळूर/ वार्ताहर
दुसऱ्या टप्प्यात निसर्गाने चांगली साथ दिल्याने येळळूरसह सुळगा, देसूर, हट्टी, राजहंसगड परिसरातील सोनम, चिंटु, कावेरी, बासमती, इंद्रायणी आदी भातपिके यावर्षी चांगली फोफावली असून आता परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोसळलेल्या धुवाधार पावसाने कोवळी रोपे पाण्याखाली गेल्यामुळे यावर्षीचा हंगाम वाया जातो की काय, अशी स्थिती असताना शेतकरी वर्गाने कोठे दुबार पेरणी तर कोठे तरू तयार करून रोपांची लावण करत काळाभोर पडलेला शिवार हिरवा केला. यासाठी त्यांनी पडेल ते कष्ट वेचले आणि शेतकऱ्यांची भूमिका निभावली. यानंतर निसर्गानेही त्यांच्या कष्टाला साथ देत पिकांच्या वाढीसाठी हात दिला. यावर्षी रोगाचाही प्रादुर्भाव फारसा झाला नाही. आता पीक परिपक्वतेच्या वाटेवर असून दिवाळी दरम्यान सुगीला सुरुवात होईल असे चित्र आहे.
पण अलीकडे ऋतुमानात फारमोठा बदल झाला असून याचा फटका भातपिकासारख्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. पूर्वीप्रमाणे पिकाला अनुकुल असे पावसाचे सातत्य नाही. चार आठ दिवसातच पाऊस धुवाधार कोसळत वर्षाची सरासरी भरून काढत असला तरी त्याच्या अनियमितपणामुळे पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतोच. पण भाताच्या उताऱ्यावर पण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
ऋतुचक्राच्या बदलाची भीती; वळिवाची धास्ती
यावर्षी तुरळक प्रमाणात का होईना पावसाची साथ चांगली लाभल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन भात उतारा चांगला मिळेल असे वाटत असतानाच निसर्गाने पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून पावसातील शेतीचा जुगार यशस्वी होईल की नाही, असा प्रश्न त्याला भेडसावत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग केंव्हा हिरावून नेईल हे सांगता येत नाही, अशी स्थिती आता निर्माण होत असून ऐन सुगीच्या काळात वळीव पुन्हा घात करतो की काय या विवंचनेत तो आहे. मळणी होऊन धान्य येईल तोपर्यंत त्याच्या जीवात जीव नसून यावर्षी तरी त्याने ओंजळीत दान टाकावे, अशी तो प्रार्थना करीत आहे
नवीन बियाण्यांकडे शेतकऱ्यांचा ओढा
आता नवनविन संशोधनामुळे कमी कालावधित जास्त उत्पन्न देणारी भातपबियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा ओढाही अशा बियाणाकडे वाढला आहे. पण ही बियाणे रोगाला व पाण्याला लवकर बळी पडतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पूर्वीची बियाणे आता जवळजवळ लुप्त झाली आहेत. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसतो आहे. कारण ऐन सुगीत प्रत्येकवर्षी पाऊस हजेरी लावतो. असेच ऋतुचक्र सुरू राहिले तर शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वीच्या महान बियाणाकडे वळावे लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.