टर्मिनस हा तळकोकणच्या अस्मितेचा आणि न्यायाचा प्रश्न
सोशल मीडियावर सावंतवाडीकरांचा संकल्प
न्हावेली /वार्ताहर
तळकोकणातील नागरिकांचा रेल्वे टर्मिनस हा दीर्घकाळाचा स्वप्नवत प्रश्न पुन्हा एकदा पेट घेत आहे. “सावंतवाडीकरांचा एकच संकल्प – टर्मिनस मिळवायचाच!” असा आवाज आता सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुपवर जोरात घुमू लागला आहे.सावंतवाडीकर नागरिक, चाकरमानी आणि तळकोकणातील बांधवांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत टर्मिनसचा मुद्दा जाहीरनाम्यात प्राधान्याने समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मते, “टर्मिनस हा केवळ रेल्वेचा नाही, तर तळकोकणच्या अस्मितेचा आणि न्यायाचा प्रश्न आहे.”अलीकडेच कणकवली आणि कुडाळ स्थानकांना आठ रेल्वेगाड्यांचे थांबे मिळाले असताना, सावंतवाडी स्थानक मात्र अजूनही उपेक्षितच राहिले आहे. कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेसच्या थांब्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांचे चार ठोस संकल्प:
1भावनिक न्याय: टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करून चाकरमान्यांच्या गैरसोयीचा अंत.
2पाणी प्रश्न सोडवणे: तिलारी धरणातून पाणीपुरवठा योजना प्राधान्याने मार्गी लावणे.
3राजकीय इच्छाशक्ती: रेल्वे बोर्डावर दबाव आणून काढलेले थांबे परत देणे आणि वंदे भारत, मंगलोर व निजामुद्दीन एक्सप्रेसचे थांबे मंजूर करणे.
4विकासाची गती: टर्मिनस व रेलोटेल प्रकल्प पूर्ण करून पर्यटन, व्यापार आणि रोजगार वाढवणे.
5नागरिकांनी स्पष्ट संदेश दिला आहे – “प्रस्तावित शक्तिपीठ माथी मारता, पण हवे असलेले टर्मिनस देत नाही, हा कोणता न्याय?”
सोशल मीडियावर हा मेसेज जोरात व्हायरल होत असून नागरिक एकमुखाने म्हणत आहेत –
“आम्हाला शक्तिपीठ नको, टर्मिनस हवे!”
“मी पुन्हा आलोय… आपलाच सुजाण सावंतवाडीकर!”
हा आंदोलनात्मक सूर पाहता, आगामी निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी येणार हे स्पष्ट झाले आहे.