‘क्रूझ भारत’चा संकल्प !
भारतानं अलीकडे पर्यटन क्षेत्रावर भरपूर भर दिलेला असून त्याअंतर्गत मोदी प्रशासनानं महत्त्वाकांक्षा बाळगलीय ती क्रूझ पर्यटनाला मोठी चालना देण्याची...भारताला 7,500 किलोमीटर्सपेक्षा जास्त लांबीचा विशाल किनारा आणि 14,500 किलोमीटर्सपेक्षा जास्त लांबीचं अंतर्गत जलमार्गांचं जाळ लाभलंय. यावरून या क्षेत्रात किती वाव दडलाय ते सहज कळून चुकतं...
केंद्र सरकारनं पाच वर्षांच्या ‘क्रूझ भारत’ मोहिमेचा शंख फुंकलेला असून त्याचं उद्दिष्ट 2029 पर्यंत भारतातील क्रूझ पर्यटन 10 लाख प्रवाशांपर्यंत वाढविणं आणि 4 लाख रोजगार निर्माण करणं...त्यात समावेश खास निधीची स्थापना, नियमांमध्ये शिथिलता अन् आर्थिक प्रोत्साहनं यांचा...केंद्रीय बंदर, जहाज उद्योग व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या मोहितेची घोषणा करताना लक्ष वेधलंय ते आपल्या देशात प्रचंड क्षमता असूनही क्रूझ पर्यंटनाचा दीर्घकाळापासून कसा फायदा उठविलेला नाही याकडे...‘ही मोहीम जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करेल नि क्रूझ पर्यटनासह सागरी व्यापाराची वाढही साध्य होईल’, ते सांगतात...
क्रूझ विकासासाठी एक विशेष यंत्रणा निर्माण केली जाईल ती भारतातील प्रमुख बंदरांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘इंडियन पोर्ट्स असोसिएशन’च्या (आयपीए) अंतर्गत..केंद्राचा प्रमुख बंदरांवर ‘क्रूझ डेव्हलपमेंट’ अधिभार आकारण्याचा देखील विचार चाललाय. हे उत्पन्न खास क्रूझ निधीकडे वळविलं जाईल. सदर निधीत उद्योगाच्या इतर स्रोतांकडून देखील पैसे जमा होतील...अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाकडून सध्या जागतिक दर्जाचे शाश्वत टर्मिनल नि मरिना, वॉटर एअरोड्रोम तसंच हेलिपोर्टसाठी तांत्रिक मानकं तयार करण्यावर काम चाललंय...
‘पीपीपी’ विकासाच्या विविध मॉडेल्ससाठी ‘मॉडेल कन्सेशन’ करार विकसित करण्याबरोबर ‘राष्ट्रीय क्रूझ इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅन 2047’ही साकारण्याचा संकल्प सोडण्यात आलाय...भारताची आंतरराष्ट्रीय क्रूझ व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीनं संयुक्त अरब अमिरात, माले, मालदीव, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, म्यानमार, बांगलादेश आणि इंडोनेशियासारख्या शेजारील देशांसोबत ‘क्रूझ अलायन्स’ निर्माण करण्याचे वेध देखील मोदी प्रशासनाला लागलेत...
विविध टप्प्यांत होणार अंमलबजावणी...
? सदर मोहीम तीन टप्प्यांत विभागललेली असून 2029 पर्यंत अंमलात आणली जाईल. केंद्राचं ध्येय आहे ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत ‘सागरी क्रूझ कॉल्स’ 125 वरून 500 पर्यंत नेण्याचं...
? याअंतर्गत यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत केंद्र बाजारपेठेचा अभ्यास करेल व आर्थिक नि नियामक मार्गांचा विचार करता कुठले प्रकल्प साकारता येतील हेही पाहिलं जाईल...
? 2025 ते 27 दरम्यान मंत्रालय नवीन क्रूझ टर्मिनल, मरिना नि स्थळं विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करेल. त्याशिवाय भरपूर क्षमता असलेली क्रूझ केंद्रं तसंच सर्किट्स सक्रिय केली जातील...
? तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून भारतीय उपखंडातील सर्व क्रूझ सर्किट्सना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल...
? नदीत क्रूझ सफारी करणाऱ्या प्रवाशांचा विचार करता त्यांचा आकडा पहिल्या टप्प्यातील 5 लाखांवरून तिसऱ्या टप्प्यापर्यंत 15 लाखांवर पोहोचेल. यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल्सची संख्या 2 वरून 10 अन् नद्यांतील क्रूझ टर्मिनल्सची संख्या 50 ते 100 अशी वाढविण्याचा इरादा बाळगण्यात आलाय..
? त्याचप्रमाणं ‘मरिनां’च्या आकड्यातही 1 वरून 5 अशी वृद्धी नोंदवली जाईल. खेरीज रोजगारनिर्मिती 1 लाखावरून 4 लाखांवर झेपावेल, असा जहाज उद्योग मंत्रालयाचा अंदाज...
नद्यांतील क्रूझ सफारींचा आनंद लुटणाऱ्यांमध्ये वाढ...
लोकसभेत यंदा सादर करण्यात आलेल्या 2024-25 च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या ठळक बाबींमध्ये सुद्धा नद्यांतील क्रूझ पर्यटन क्षेत्राचा जलद विस्तार अधोरेखित करण्यात आलाय. हा अंतर्गत जलमार्गांमध्ये झालेल्या वाढीचा परिपाक...ऑक्टोबर 2024 पर्यंत दिवसा होणाऱ्या क्रूझ सफारांची निवड करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढून 82,587 वर पोहोचली होती. तर रात्रीच्या सफारींचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांचा 11,431 हा आकडा आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत पाचपट मोठा...
ही वृद्धी साध्य झालीय ती सरकारनं सतत लक्ष दिल्यामुळं. परिणामस्वरूप अंतर्गत जलमार्ग पर्यटनासाठी अधिक सुलभ झालेत. राष्ट्रीय जलमार्गांच्या जाळ्याच्या विस्तारामुळं केवळ मालवाहतुकीला चालना मिळालेली नाही, तर प्रादेशिक पर्यटनासाठी नवीन वाटाही खुल्या झाल्याहेत...गंगा, ब्रह्मपुत्रा व गोदावरी यासारख्या प्रमुख नद्यांमध्ये आता क्रूझ पर्यटन वाढलंय. यामुळं प्रवाशांना निसर्गरम्य नि तल्लीन करणाऱ्या सफारी अनुभवायला मिळताहेत. नद्यांतील क्रूझची वाढती लोकप्रियता भारताच्या ‘इको-टुरिझम’ला चालना देण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत अशीच. शिवाय यामुळं पर्यटकांना कमी ज्ञात ठिकाणं पाहण्याची संधी मिळण्याबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना मिळतेय ती वेगळी...
क्रूझ पर्यटनाचा वाढता आलेख...
2023-24 मध्ये क्रूझ पर्यटनानं अनुभवले ते 4.70 लाख प्रवासी. हा आकडा ‘कोव्हिड’ महामारीपूर्व कालावधीपेक्षा जास्त. विशेष म्हणजे 2019-20 च्या तुलनेत देशी पर्यटकांचा वाटा वाढून जवळपास 85 टक्क्यांवर पोहोचल्याचं सरकारी आकडेवारीवरून दिसून येतं. ही बाब देशांतर्गत क्रूझ पर्यटन कसं लोकप्रिय होत चाललंय ते दाखवून देतं...2019-20 मध्ये देशी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटकांचा वाटा जवळपास 50-50 टक्के असा सामना होता. त्यावेळी एकूण प्रवाशांची संख्या होती 4.2 लाखांपेक्षा थोडी जास्त...
कोव्हिड महामारीच्या वेळी स्वाभाविकपणे सेवा बंद पडली. 2021-22 मध्ये देशी पर्यटकांची पावलं क्रूझकडे परत वळली, परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा अभाव जाणवला...2022-23 मध्ये देशी क्रूझ पर्यटकांची संख्या वाढून जवळपास 4 लाखांपर्यंत पोहोचलेली असताना आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या जेमतेम 29,026 इतकी होती. परंतु 2023-24 मध्ये हे चित्र बदलून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या तिपटीनं वाढत 98,344 च्या घरात पोहोचली...या क्षेत्रात असलेला वाव विचारात घेऊन जी अनेक पावलं उचलली गेली त्यांचं यात मोलाचं योगदान राहिलंय. यात इतर जहाजांपेक्षा क्रूझ जहाजांना बर्थची जास्त हमी, सर्व प्रमुख बंदरांसाठी सवलतीचा व एकसमान बर्थिंग दर, ई-व्हिसा नि ‘ऑन-अॅरायव्हल व्हिसा’ सुविधा, सर्व बंदरांसाठी वैध ‘सिंगल ई-लँडिंग कार्ड’ यांचा समावेश...
या कालावधीत मुंबई, गोवा, न्यू मेंगळुरू आणि कोची बंदरांवर आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजं नियमित दाखल झाली...मुंबई-गोवा, मुंबई-दीव, मुंबई-कोची, मुंबई-लक्षद्वीप, मुंबई-‘हाय सी’ आणि चेन्नई-वैझाग मार्गांवर देशांतर्गत क्रूझ सेवा सप्टेंबर, 2021 पासून सुरू झाल्याहेत. शिवाय गंगा नदीत वाराणसी-हल्दिया नि ब्रह्मपुत्रेच्या धुबरी-सादिया टप्प्यासह नद्यांतील क्रूझ पर्यटनासाठी नऊ जलमार्ग कार्यरत आहेत. यापैकी ‘गंगा विलास’ (वाराणसी ते आसाममधील दिब्रुगड) ही सर्वांत मोठी ‘रिव्हर क्रूझ’...गुजरातच्या साबरमतीमध्ये देखील क्रूझ पर्यंटन पोहोचलंय...
यमुना नदीचीही भर...
नद्यांतील क्रूझ पर्यटनात आता यमुनाचीही भर पडणार आहे. याअंतर्गत सोनिया विहार नि जगतपूर दरम्यानच्या पाच किलोमीटरांच्या मार्गावर लवकरच फेरीसेवा सुरू होईल. ही योजना 2016 पासून विचारात होती, मात्र आता ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं पावलं पडलीत. त्याकरिता भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणानं दिल्ली सरकारच्या विविध यंत्रणासोबत गेल्या महिन्यात सामंजस्य करार केलाय...
या उपक्रमात एका वेळी 20-30 प्रवाशांना वाहून नेण्याच्या दृष्टीनं रचना केलेल्या अन् सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘हायब्रिड’ बोटींचा समावेश असेल. सुरक्षितता व सुविधा प्रदान करण्यासाठी त्यामध्ये बायो-टॉयलेट, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि लाईफ जॅकेट्स असतील. नद्यांतून प्रवास करू पाहणारे पर्यटक आणि स्थानिक या दोघांसाठीही ही व्यवस्था सुलभ ठरेल...मार्च, 2016 मध्ये अंतर्गत जलमार्ग कायदा लागू झाल्यानंतर जगतपूर-दिल्ली ते उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील संगमापर्यंतचा यमुनेचा भाग हा ‘राष्ट्रीय जलमार्ग-110’ म्हणून घोषित करण्यात आला होता...
गोव्याला ‘क्रूझ हब’ बनण्याची संधी...
गोव्यात नुकत्याच झालेल्या सागरी राज्य विकास परिषदेच्या बैठकीत संकल्प व्यक्त करण्यात आला तो या चिमुकल्या राज्याला जागतिक ‘क्रूझ हब’मध्ये रूपांतरित करण्याचा. मुरगाव बंदरात आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची उभारणी हाती घेण्यात आलीय ती त्याचसाठी...या बंदरात 2013-2014 मध्ये 18 क्रूझ जहाजांतून 17,397 प्रवासी दाखल झाले होते. 2018-2019 मध्ये ही संख्या 35 जहाजं नि 47,778 प्रवासी अशी वाढली. 2023-24 आर्थिक वर्षात गोव्यात येणाऱ्या क्रूझ प्रवाशांमध्ये 40 टक्के वाढ नोंदविली गेली...
संकलन : राजू प्रभू