दलितांचा राखीव निधी गॅरंटी योजनांसाठी वापरू नये
दलित संघर्ष समिती (भीमवाद) ची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : दलित समाजासाठी राखीव असलेल्या निधीचा राज्यातील गॅरंटी योजनांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे दलित समाजासाठी विकासनिधी अपुरा पडत असल्याने हा निधी इतर योजनांसाठी वापरला जाऊ नये, अशी मागणी कर्नाटक दलित संघर्ष समिती (भीमवाद) बेळगावच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. शुक्रवारी सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन करून मागण्या मांडण्यात आल्या. बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीतील किल्ला तलाव येथे मध्यभागी भगवान बुद्धांच्या शंभर फूट उंचीच्या मूर्तीचे तात्काळ बांधकाम करावे.
चिकोडी तालुक्यातील मुगळी गावानजीक विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थी घरीच राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रस्त्याचे बांधकाम करावे. डॉ. बी. आर. आंबेडकर विकास महामंडळ व इतर विकास महामंडळांना कर्जमुक्त करून खऱ्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करावे. दलितांवर अत्याचार व दडपशाही सुरू असून यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी. यासह इतर मागण्यांसाठी दलित संघर्ष समितीने आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील निवडणुकीवेळी सरकारला अद्दल घडविली जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी संघटनेचे विभागीय समन्वयक रवी बस्तवाडकर, जिल्हा समन्वयक सिदराय मेत्री यांच्यासह बेळगाव व उत्तर कर्नाटकातील पदाधिकारी उपस्थित होते.