Pandharpur Politics : राज्यातील आरक्षण वादाचे पंढरीत पडसाद
एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी तापले पंढरपुरात वातावरण
पंढरपूर : येथील शासकीय विश्रामगृहात लक्ष्मण हाके यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक वाद झाला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांमुळे वातावरण तापलं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यादरम्यान येथील विश्रामगृहावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हाके यांना पाहून घोषणाबाजी सुरु केली. एक मराठा लाख मराठा, जरांगे-पाटील आगे बढो अशी घोषणाबाजी सुरु असताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर, लक्ष्मण हाके यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली. दरम्यान हा वाद टोकाला गेल्याने लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
जरांगे यांनी मिडिया ट्रायल बंद करावी
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगे यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपास करेलच. धनंजय मुंढे असे काही करतील, असे वाटत नाही. जरांगे यांनी मीडिया ट्रायल बंद करावी, असा टोला हाके यांनी लगावला.
प्रसंगी महाराष्ट्र बंद करु
सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामागचा मास्टर माईंड शोधून काढावा अन्यथा मराठा समाज राज्यात तांडव केल्याशिवाय राहणार नाही. शिवाय प्रसंगी महाराष्ट्र देखील बंद करू : - धनाजी साखळकर - ( मराठा क्रांती मोचचि राज्य समन्वयक )