‘सीपीआर’मधील हृदयरोग विभागाचे नुतनीकरण संथगतीने...
प्रचंड धुळीने डॉक्टरांसह रूग्ण, नातेवाईक त्रस्त, उपचार करताना अडचणी
आयसीयु, ऑपरेशन थिएटर बंदच
नुतनीकरणानंतर हायटेक उपचार
कोल्हापूर
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयामध्ये (सीपीआर) नुतनीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या ह्दृयशस्त्रक्रिया विभागाचे काम संथगतीने सुरू आहे. नुतनीकरणसाठी 52 कोटींचा निधी असुनही गेल्या 6 महिन्यापासून कासवगतीने काम सुरू आहे. आता तर येथील काम थांबले असल्याची स्थिती निर्माण झाल्याने हृदयाशी निगडित उपचारासाठी आलेल्या रूग्णांना अस्ताव्यस्त पडलेले साहीत्य, धुळीचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनाही उपचार करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हृदयरोग विभागात रोज 50 ते 60 रूटीनचे पेशंट तपासणीसाठी येतात. यामध्ये नव्यानेही रूग्ण दाखल होत असतात. रोज आठ ते दहा रूग्णांवर अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी केली जाते. हृदयरोग विभागात दिवसाला 8 ते 10 रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. शस्त्रकियेनंतर गंभीर रूग्णांना आयसीयुमध्ये ठेवावे लागते. मात्र, येथील आयसीयु विभागच बंद असल्याने ऑपरेशन झाल्यानंतर रूग्णाला ट्रामा केअर किंवा जुन्या इमारतीमधील आयसीयुमध्ये शिफ्ट करावे लागते. शिफ्ट करताना कर्मचारी व नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरून स्ट्रेचर नेताना ऑपरेशन झालेल्या रूग्णांना धक्के खातच ट्रामा केअर सेंटर व जुन्या इमारतीच्या आयसीयुमध्ये दाखल करावे लागत आहे. याचा रूग्णांना अधिक त्रास होत आहे.
वारणा इमारतीमधील हृदयरोग व ह्दृयशस्त्रक्रिया विभागाच्या नुतनीकरणाचे काम साधारणत: मे महिन्यामध्ये सुरू झाले. काम थांबल्याने याठिकाणी प्रचंड प्रमाणात धुळ साचत आहे. धुळीचा सामना करतच डॉक्टरांना रूग्णांवर उपचार करावे लागत आहे. या धुळीचा हृदयाशी निगडित रूग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचार करतानाही डॉक्टरांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बांधकामाचे साहीत्य अस्ताव्यस्त पडले असल्याने हा विभाग अडगळीचा विभाग बनला आहे. ऑपरेशन थिएटरचे काम अपुर्ण असल्याने कॅथलॅबमध्येच अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी करावी लागत आहे.
कॅथलॅबमध्येच पेशंटची तपासणी
नुतनीकरण सुरू असले तरी हृदयरोग विभागातील कॅथलॅब सुरू ठेवल्याने रूग्णांना तपासणीसाठी व उपचारासाठी मदत होत आहे. रोज हृदयाच्या जनरल चेकअप येणाऱ्या रूग्णांना कॅथलॅबमध्येच तपासले जात आहे. रूग्णांची संख्या वाढल्यास तपासणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.
हृदयरोग विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची गरज
हृदयाशी निगडित आजारामध्ये अनेकवेळा गुंतागुंतीची स्थिती निर्माण होत असते. अशा स्थितीत त्वरित उपचारासह अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी झाल्यानंतर रूग्णाला तत्काळ आयसीयुची गरज भासते. ऑपरेशन थिएटर व आयसीयु विभाग बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून हृदयरोग विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
नुतनीकरणानंतर हायटेक
नुतनीकरणानंतर सर्वच विभागांचे रूपडे पालटणार असे बोलले जात आहे. हृदयरोग विभागामध्येही हायटेक सुविधा मिळणार आहेत. अधुनिक तंत्रज्ञ विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे हृदयाशी निगडित विविध आजारांवर दर्जेदार व मोफत उपचार मिळणार आहेत. याचा गरीब व गरजुंना लाभ होणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामाची स्थिती पाहता काम पुर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हृदयरोग विभाग लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे प्रयत्न
हृदययोग विभागाचे काम पूर्णत्वास आले आहे. कामाला आणखी गती देवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. धूळीमुळे रूग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. काही दिवसातच हृदयरोग विभाग पूर्णं क्षमतेने सुरू होण्यासाठी कार्यवाही केली जाईल.
डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधिक्षक