विशाळगडावरील उर्वरित अतिक्रमणे हटवावीत
कोल्हापूर :
विशाळगडावरील उर्वरित अतिक्रमणे सममर्यादा ठेवून हटवावी अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीने केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे 14 जुलै 2024 रोजी शिवभक्तांच्या उद्रेकानंतर प्रशासनाने विशाळगडावरील 15 जुलैला अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी 94 अतिक्रमणे हटवण्यात आली. अद्यापही 50 पेक्षा अधिक अतिक्रमणे आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयाने पुरातत्त्व विभागास उर्वरित अतिक्रमणाविषयी सुनावणी घेऊन ती सुद्धा तात्काळ निष्कासित करण्या संदर्भात पुढील निर्णय घेण्यास सांगितले आहे. यामुळे प्रशासनाने ही अतिक्रमणे समर्यादा ठेवून हटवावीत. तसेच प्रशासनाने आराखडा टाकून गडावरील मंदिरे आणि योद्धांच्या स्मारकांचा जिर्णोद्धार करावा अशीही मागणी केली आहे. जुलै 2024 पासून प्रशासनाने गजापूर पासून विशाळगड वर जाणारा रस्ता बंद केला असून काही संघटनांनी हा रस्ता सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र गडावरील अतिक्रमण पूर्णपणे काढल्यानंतरच हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करावा असे मागणी समितीने केले आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळ परिसरात ऐतिहासिक स्मारक उभारण्यात यावे, गडांची डागडुजी करावी अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी बाबासाहेब भोपळे, शिवसेना जिल्हा प्रमुख उदय भोसले,संभाजी भोकरे,मनोहर सोरप, शिवानंद स्वामी,विश्वास पाटील, सुधाकर मिरजकर, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.