मध्यवर्ती बसस्थानकाला काँक्रीटकरणाची प्रतिक्षा
प्रवाशांना धुळीचा त्रास
एमआयडीसीचा निधी कोल्हापुरातील बसस्थानकांना मिळणार काय?
कोल्हापूर
मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. परंतू एसटी प्रशासनाकडून येथे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण केलेले नाही. यामुळे प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे.
एसटी महामंडळाची कोल्हापुरात 12 डेपो आहेत. यामध्ये मध्यवर्ती बसस्थानक हा सर्वात प्रवाशांची गर्दी असणारा डेपो आहे. या ठिकाणी रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. परंतू याच डेपोकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील रस्त्याची दयनीय स्थिती झाली आहे. एसटी बस प्लाटवर आल्यानंतर तसेच प्लाटवरून मार्गस्थ झाल्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य होते. प्रवाशांना याचा त्रास होत आहे. तसेच वाहनधारकांनाही बस फलाटवर लावण्यासाठी दमछाक होते. त्यामुळे सीबीएसमध्ये तत्काळ काँक्रिटकरण करण्याची गरज आहे.
183 बसस्थानकाच्या यादीत सीबीएस आहे का?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील 183 बसस्थानकांच्या परिसराचे कॉंक्रिटीकरण होणार आहे. त्यासाठी सुमारे 600 कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने जाहीर केले होते. या 186 बसस्थानकाच्या यादीत तरी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा समावेश असणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.