सर्व अपहृतांची हमासकडून मुक्तता
गाझा युद्ध संपल्याची ट्रम्प यांची घोषणा, आता लक्ष शांतता कराराच्या दुसऱ्या अधिक अवघड टप्प्याकडे
वृत्तसंस्था / तेल अवीव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचविलेल्या शांतता कार्यक्रमाच्या अनुसार हमास या संघटनेने इस्रायलच्या सर्व जिवंत अपहृतांची मुक्तता केली आहे. असे 20 अपहृत असून त्यांना इस्रायलच्या आधीन करण्यात आले आहे. आता गाझातील युद्धाची समाप्ती झाली आहे, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचे सोमवारी सकाळी इस्रायलमध्ये आगमन झाले असून ते इस्रायल, हमास आणि संबंधित देशांच्या संयुक्त शांतता करारावरील स्वाक्षरी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू हे देखील त्यांच्यासह आहेत.
हमासने सर्व जिवंत अपहृतांची मुक्तता केली आहे, या वृत्ताला या प्रकरणात मध्यस्थ असणाऱ्या सर्व देशांनी दुजोरा दिला आहे. मुक्त करण्यात आलेल्या अपहृतांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच, त्यांच्यापैकी सात जणांची भेट त्यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. या घटनेमुळे इस्रायलमध्ये आनंदी आनंद साजरा करण्यात येत आहे. अमेरिकेच्या शांतता प्रस्तावानुसार सर्व जिवंत अपहृतांच्या मुक्ततेसमवेत जे हमासच्या बंदीवासात मृत झालेले अपहृत आहेत, त्यांचे मृतदेहही इस्रायलच्या आधीन करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास मध्यस्थांनी व्यक्त केला.

युद्धाचे मूळ कारण समाप्त
दोन वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरच्या रात्री हमासच्या शेकडो दहशतवाद्यांनी इस्रालयमध्ये घुसून धुमाकूळ घातला होता. त्यांनी साधारणत: 1,200 इस्रायली नागरिकांची हत्या केली होती. तर अनेक महिलांवर अत्याचार केले होते. तसेच साधारणत: 250 इस्रायली आणि इतर देशांच्या नागरिकांचे अपहरण केले होते. यामुळे इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला होता. हे युद्ध दोन वर्षांहून अधिक काळ चालले आहे. त्यात 70 हजारहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपहृतांची त्वरित सुटका करा, अशी मागणी इस्रायलने केली होती. तथापि, हमासने ती मानण्यास नकार दिल्याने युद्ध लांबले होते. अखेर अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर त्यांनी इस्रायल आणि हमास यांना एकत्र आणून हे युद्ध थांबविण्याच्या कामी पुढाकार घेतला. सर्व जिवंत अपहृतांची सुटका झाल्याने युद्धाचे मूळ कारण संपले आहे. त्यामुळे ते थांबणार आहे.

प्रथम सात जणांची मुक्तता
सोमवारी सकाळपासूनच हमासकडून अपहृतांच्या मुक्ततेच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. प्रथम सात जणांची मुक्तता करुन त्यांना इस्रायलच्या सैन्याच्या आधीन करण्यात आले. त्यानंतर दोन तासांनी उर्वरित 13 जणांची मुक्तता करण्यात येऊन त्यांना रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आधीन करण्यात आले. रेडक्रॉसने त्यांना इस्रायलच्या सैन्याकडे सोपविले आहे. प्रथम सोडलेल्या सात जणांची त्यांच्या नातेवाईकांनीही भेट घेतल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
इस्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे भाषण
गाझा युद्ध आता थांबले आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलमध्ये पोहचताच केली. इस्रायलची संसद ‘नेसेट’मध्ये त्यांनी भाषणही केले. तसेच नेसेटच्या नोंदपुस्तिकेत त्यांनी ‘हा श्रेष्ठ आणि सुंदर दिवस आहे. हा माझा मोठा सन्मान आहे, अशा शब्दांमध्ये आपली कृतकृत्यता नोंदपुस्तिकेत व्यक्त करत त्यांची वैशिष्ट्यापूर्ण स्वाक्षरीही केली. त्यानंतर त्यांचे इस्रायलच्या संसदेत सर्व उपस्थित संसद सदस्यांसमोर भाषण झाले. त्यांनी इस्रायलचे आभार मानले आहेत.
शांतता स्थायी राहणार का?
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष संपला असला तरी, ही शांतता प्रदीर्घ काळपर्यंत स्थायी राहणार का, हा प्रश्न अभ्यासकांकडून विचारण्यात येत आहे. कारण आजवर शांततेचे बरेच करार इस्रायल आणि त्याच्या शत्रूंमध्ये झालेले आहेत. तथापि, त्यांच्यापैकी एकही करार दीर्घकाळ टिकून राहिलेला नाही, असा आजवरचा इतिहास आहे. सध्या निर्माण झालेली शांतता टिकून राहील की नाही, हे या शांतता प्रस्तावाच्या दुसऱ्या आणि त्याच्यापुढच्या टप्प्यांचे कार्यान्वयन कसे केले जाते, त्यावर अवलंबून आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करारावर अद्याप अधिकृत स्वाक्षरी व्हायची आहे, ही बाब महत्वाची मानण्यात येत आहे.

हमासचा स्वाक्षरी करण्यास नकार
अमेरिकेने मांडलेल्या शांतता प्रस्तावाच्या दुसऱ्या भागावर स्वाक्षरी करण्यास हमासने नकार दिला आहे. या भागातील काही तरतुदींना आमचा तीव्र विरोध आहे, असे या संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले. हमासचे संपूर्णपणे नि:शस्त्रीकरण केले जावे. हमासच्या पॅलेस्टाईनच्या राजकारणाशी कोणताही संबंध असू नये. त्यांनी गाझापट्टीची सत्ता सोडली पाहिजे. तसेच हमासच्या सर्व नेत्यांनी आणि महत्वाच्या कार्यकर्त्यांनी गाझापट्टी सोडून जगात इतरत्र कोणत्याही देशात आश्रय घ्यावा, अशा तरतुदी या भागात आहेत. या सर्व तरतुदी हमासने नाकारल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. हमासने करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने इस्रायलनेही करारावार स्वाक्षरी करण्यास नकार दिला. परिणामी, सोमवारी निर्माण झालेली शांतता किती काळ टिकेल, यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ट्रम्प यांचे नागरिकांकडून आभार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इस्रायलच्या नागरिकांकडून आभार, असा आशय असणारे वाक्य मोठ्या अक्षरांमध्ये जेरुसलेम नजीकच्या वाळवंटात इस्रायली नागरिकांनी कोरलेले होते. या वाक्यावरुनच ट्रम्प यांचे ‘फोर्स वन’ हे अधिकृत विमान उडत गेले, अशी रोचक माहितीही या हृद्य प्रसंगानंतर देण्यात आली.
कराराचा प्रथम भाग पूर्ण
ड अमेरिकेने मांडलेल्या इस्रायल-हमास शांतता कराराच्या प्रथम टप्प्याची पूर्तता
ड दुसरा टप्पाही त्वरित कार्यान्वित करण्याच्या हालचाली, तो आहे जास्त कठीण
ड इस्रायली सैनिकांची गाझापट्टीतून विशिष्ट रेषेपर्यंत माघारीची प्रक्रियाही पूर्ण