62 लाख वर्षांपूर्वी वाळवंट होता लाल सागर
हिंदी महासागराच्या पुरामुळे मिळाले सागराचे स्वरुप
सुमारे 62 लाख वर्षांपूर्वी लाल समुद्र पूर्णपणे कोरडा पडला होता, तो एका भयंकर पुरामुळे पुन्हा भरून गेला, जो बहुधा समुद्रतळात 320 किलोमीटर लांब आणि खोल दऱ्यामुळे वेगळा झाला. हे पृथ्वीवरील सर्वात प्रतिकूल हवामान होते. लाल सागराचे खोरे पृथ्वीवरील सर्वात टोकाच्या पर्यावरणीय घटनांना अनुभवणारे आहे. जेव्हा हे पूर्णपणे कोरडे पडले आणि मग अचानक 62 लाख वर्षांपूर्वी भरून गेले. या पुरामुळे खोरे बदलले आणि सागरी स्थिती बहाल झाली आणि लाल समुद्राला हिंदी महासागराशी स्थायी कनेक्शन मिळाल्याचे सौदी अरेबियातील किंग अब्दुल्लाह युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या संशोधिका तिहाना पेन्सा यांनी सांगितले आहे.
लाल सागर कसा अस्तित्वात आला?
लाल समुद्राची सुरुवात 3 कोटी वर्षांपूर्वी झाली. आफ्रिका आणि अरबच्या टेक्टॉनिक प्लेट्स वेगळ्या होऊ लागल्या, यामुळे हे एक खोल खोरे निर्माण झाले, यात सरोवरे होती. सुमारे 2.3 कोटी वर्षांपूर्वी भूमध्य समुद्राने याला भरले. परंतु 60 लाख वर्षांपूर्वी असे काहीतरी घडले, ज्यामुळे सर्व बदलून गेले.
मिठाचे संकट, समुद्र कोरडा
60 लाख वर्षांपूर्वी लाल समुद्रात 6 लाख 40 हजार वर्षांचे ‘मीठ संकट’ निर्माण झाले. समुद्राची पातळी खालावली, मिठाचा स्तर वाढला, काही ठिकाणी 2 किलोमीटरपर्यंत खोलवर मीठ जमा झाले. सागरी जीवन मृतप्राय झाले. हा सागर पूर्णपणे कोरडा झाला, एका खाऱ्या वाळवंटाचे स्वरुप याला प्राप्त झाले होते, असे नव्या अध्ययनात आढळून आले आहे.
वैज्ञानिकांचे संशोधन
तिहाना पेन्सा आणि त्यांच्या टीमने सागरतळाच्या खडकांचा डाटा आणि सीस्मिक (भूकंपीय)डाटाचा वापर केला, हा डाटा सागराच्या इतिहासात जमा तळ आणि मिठाचे आवरण दर्शवितो. पूर्ण सागराच्या तळात एक अनकॉन्फॉर्मिटी असून जुनी, झुकलेल्या तळाच्या आवरणांवर अचानक एक सरळ आवरण चढलेले असल्याचे त्यांना आढळून आले. यातून पूर्ण सागर त्यावेळी कोरडा पडला होता हे दिसून येते. घटनांचा काळ जाणून घेण्यासाठी संशोधकांनी रेडिओअॅक्टिव्ह स्ट्रॉन्शियमचे अध्ययन केले. हा समुद्रात एका निश्चित दराने बदलतो. तसेच सुक्ष्म जीवाश्म (मायक्रोफॉसिल्स) दिसून आले. 1.4 कोटी ते 62 लाख वर्षांपूर्वीपर्यंत हे जवळपास गायब होते, कारण सागर एकतर खूपच मिठयुक्त होता किंवा पूर्णपणे कोरडा पडला होता.
हिंदी महासागराचे कनेक्शन
पाणी आणि जीवन लाल समुद्रात हिंदी महासागरामुळे परतल्याचे संशोधकांचे मानणे आहे. एडनच्या आखातात हनिश सिल नावाचा ज्वालामुखी आणि समुद्री पर्वत तोडून हे पाणी पोहोचले. हा पूर अत्यंत मोठा होता. हा इतका शक्तिशाली होता की हे एडनच्या उपसागरापासून लाल समुद्रापर्यंत 320 किलोमीटर लांब, 8 किलोमीटर रुंद पाण्याखालील खोरे कापून गेला होता.
पृथ्वीच्या इतिहासात महत्त्व
ही घटना पृथ्वीच्या सर्वात टोकाच्या पर्यावरणीय परिवर्तनांपैकी एक आहे. यातून कशाप्रकारे प्लेट टेक्टॉनिक्स, सागरपातळी आणि हवामान बदल मोठे बदल घडवून आणू शकतात हे कळते. लाल समुद्र आज ज्याप्रकारचा दिसतो, त्यामागे पूर हे कारण आहे. संबंधित अध्ययन कम्युनिकेशन्स अर्थ अँड एनव्हॉयरन्मेंट नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.