महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

असरच्या अहवालाचे वास्तव

06:15 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

असर (ASER) समिती भारतातील वेगवेगळ्या शालेय विद्यार्थ्यांचा सर्व्हे घेऊन शिक्षणाविषयी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत असते. 2023 सालचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वाचन इयत्ता दुसरीच्या पातळीचे आहे, असे निदर्शनास आणून दिले आहे. 

Advertisement

गेली काही वर्षे असर समिती वाचन कौशल्याचा अभाव असल्याचे वारंवार सांगत आली आहे परंतु त्यावर कोणीच काही करायला तयार नाही. अलीकडेच पुणे शहरातील रास्ता पेठेतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या विद्यार्थिनींचा वाचनाचा वर्ग घेतला. त्यांच्याच पाठ्यापुस्तकामधील ‘इंटलेक्चुअल रबिश’ या बर्ट्रांड रसेल लिखित धड्यातील चार वाक्ये विद्यार्थिनींना वाचून त्या चार वाक्यांचा अर्थ लावता आला नाही. धड्यामध्ये अनेक गमतीशीर विरोधाभास वाचकाला विचार करायला भाग पाडतात. अॅरीस्टॉटल या तत्ववेत्याने एकदा असे विधान केले की स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात असतात. खरे तर असे अनुमान काढण्यापूर्वी अॅरीस्टॉटलने आपल्या पत्नीचे दात मोजले असते तरी हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे त्याला समजले असते. परंतु अत्यंत हुशार व्यक्ती बरेच वेळा आपल्याला माहित असल्याचे गृहीत धरतात ही ‘सिली मिस्टेक’ असल्याचे लेखकाने मुद्देसुदपणे मांडले आहे. तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावून घेण्याची गरज अधोरेखित करणारा हा धडा नववीच्या मुलींना त्यांच्या शाळेत शिकवला असूनही तो वाचता आला नाही. याचे कारण शाळेमध्ये धडा शिकवला जातो पण वाचून घेतला जात नाही. शालेय शिक्षक जो ‘होमवर्क’ देतात त्यामध्ये प्रश्नांची उत्तरे लिहून आणणे अपेक्षित असते. समस्त विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे पुस्तकामध्ये किंवा ‘गाईड’मध्ये बघून लिहितात.

Advertisement

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मराठी-हिंदी वाचन हा असाच गंभीर प्रश्न आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी-मराठी वाचून समजत नाही आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचायला अवघड जाते.  ‘दिव्याच्या शोधामागचे दिव्य’ या धड्यामध्ये एडिसनला अंधाऱ्या रात्री प्रकाश देणारी एखाद्या वस्तूची निर्मिती करण्याची कल्पना सुचली. त्या धड्यामध्ये ‘हातच्या काकणाला आरसा कशाला?’ असे एडिसन कसे काय म्हणाला? हा प्रश्न विचारला असता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचे उत्तर देता आले नाही कारण त्या वाक्याचा आधीच्या वाक्याशी संबंध लावून त्यानुसार अर्थ लावणे बहुतांश विद्यार्थ्यांना जड जाते. मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी वाचनाची पातळी किमान चार इयत्ता खालची आहे. त्यामुळे चार वाक्ये वाचून त्यांचा अर्थ लावणे आणि अनुमान काढणे अनेक विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरते. ‘प्रश्न क्रमांक 1 ते 4 मधील कोणतेही दोन प्रश्न सोडवा, प्रश्न क्रमांक 5 ते 8 मधील कोणताही एक प्रश्न सोडवा, प्रश्न क्रमांक 9 आणि 10 अनिवार्य आहेत’ अशा प्रकारच्या चार वेगळ्या सूचना प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला दिल्यास त्याचा सुसंगत अर्थ विद्यार्थ्यांना लावता येत नाही कारण वाचनाचा अभाव.

या समस्येवर अनेक उपाय आहेत. प्रत्येक शाळेने आठवड्यातून किमान एक तास वाचन करवून घेण्यासाठी राखून ठेवल्यास हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.  परंतु अनेक शाळा अभ्यासक्रम उरकण्यास प्राधान्य देतात. यामुळेच महाराष्ट्र शासनाने आदेश काढून आठवड्यातून किमान एक तास वाचनाचा घेणे अनिवार्य करणे ही आजच्या काळाची गरज आहे. असा तास प्रत्येक भाषेमध्ये घेताना शिक्षकांनी फक्त हुशार मुलांकडून वाचन करून घेणे अपेक्षित नाही. वर्गातील सर्व मुलांना वाचन करवून घेतल्यास शालेय शिक्षण सार्थकी लागेल, यासाठी सर्वच पालकांनी प्रत्येक शाळेत याकरिता आग्रह धरावा. वाचन करवून घेण्याचे कोणतेही क्लासेस लावून हा प्रश्न सुटणार नाही. घरचा अभ्यास म्हणजे पालकांनी मुला-मुलींकडून वाचन करवून घेणे, हे अपेक्षित आहे. आजच्या शिक्षणामध्ये क्रमिक पुस्तके ही सर्वात दुर्लक्षित बाब झाली आहे. शिक्षक धडा शिकवतात, मुले बघून प्रश्न सोडवतात किंवा धडा शिकवताना जे ऐकले जाते त्यामधून आठवून प्रश्नांची उत्तरे लिहिली जातात.

असर अहवालामधील दुसरे निरीक्षण गणित सोडवण्यासंदर्भात आहे. नववी ते बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना 883 भागिले 7 असे भागाकार करता येत नाहीत. खरे तर हा भागाकार तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांना करता येणे अपेक्षित आहे.  शहरी शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना रोजच्या व्यवहारातील बेरजा-वजाबाक्या येत नाहीत. त्यामुळे अर्धा किलो तूरडाळ, एक किलो तांदूळ आणि पाव किलो साखर यांचा तोंडी हिशेब करणे आठवीच्या मुला-मुलींच्या आवाक्याबाहेरचे असते.  जे व्यवहार ज्ञान भाजी विक्रेत्याच्या बारा वर्षाच्या मुलीला येते ते नववीत शिकणाऱ्या मुलांना येत नाही कारण गणित का शिकायचे आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा, हे मुलांना सांगितले जात नाही. तसेच व्यवहार करण्याची संधीही पालकांकडून त्यांना मिळत नाही. येणाऱ्या काळात असे हिशेब करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल-कॉम्प्युटर असेल पण अशी गणिते केल्यामुळे तार्किक विचार करण्याची सवय त्यांना असणार नाही. ‘रात्री सव्वा दहा वाजता झोपून आठ तासांनी जागे झाल्यावर घड्याळात किती वाजले असतील?’ या प्रश्नाचे उत्तर डिजिटल घड्याळांच्या युगातल्या मुला-मुलींना सहजगत्या देता येत नाहीत.  ‘पाचशे ग्रॅमचे पाच पुडे, दोनशे पन्नास ग्रॅमचे चार पुडे आणि पाव किलोचे चार पुडे एकत्र केल्यास एकूण वजन किती किलो भरेल?’ हा प्रश्न आठवीतले विद्यार्थी तोंडी सोडवू शकत नाहीत.

यावर उपाय म्हणून इयत्ता सातवी-आठवीपासून विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे मंडईमध्ये पाठवणे, किराणा सामान खरेदीचे काम मुला-मुलींना देणे, घरामध्ये येणाऱ्या दुधाचा हिशेब करण्याची जबाबदारी पालकांनी मुलांकडे सोपवल्यास हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. वजनकाटासुद्धा डिजिटल झाल्यामुळे वजन करण्याची प्रक्रिया मुलांना समजणे अवघड जाते. तराजूमध्ये वजन कसे केले जाते, याचा अनुभव शाळेने किंवा पालकांनी दिल्यास वजन करण्यामधील लॉजिक मुलांना समजू शकेल.  ‘4,500 च्या वस्तूवर वीस टक्के सवलत मिळाल्यास ती वस्तू किती रुपयाला मिळेल?’ अशी गणिते अनेक विद्यार्थ्यांना जड जातात, असे असर अहवाल सांगतो.  ‘दोन लाख रुपये कर्ज तीन बँका प्रत्येकी 12 टक्के, 13 टक्के, 14 टक्के दराने देत असल्यास बँकेला दोन वर्षांनंतर एकूण किती पैसे परत द्यावे लागतील?’ अशी गणिते करणे नववीच्या विद्यार्थ्यांना सोडवता येत नसतील तर त्यांनी दहावीनंतर कॉमर्स किंवा सायन्स शाखेमध्ये प्रवेश का घ्यावा, हा मोठाच प्रश्न आहे.

आज नववी दहावीमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी इंग्रजीमध्ये लिहिलेली पाच वाक्ये समजून वाचू शकत नसल्यास उद्या ही मुले स्वत:चा बायो-डेटा स्वतंत्रपणे लिहू शकणार नाहीत. आज अनेक पदवीधर विद्यार्थी बायो-डेटा लिहिण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असणारे नमुने वापरतात, त्यातला मजकूरही इंटरनेटवरून कॉपी केलेला असतो. आर्टीफिशियल इंटेलीजन्स टूल्स वापरून बायोडेटा करता येईल पण मुलाखतीमध्ये उत्तरे देण्यासाठीचे कौशल्य कुठून आणणार? त्याची तयारी क्लासेसमधून केल्यास कदाचित नोकरी मिळेलही पण ती नोकरी टिकणार कशी? पगार मिळाल्यास त्याचा खर्चाचा ताळमेळ कसा बसवणार? असे अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत आणि त्याचे मूळ वाचन कौशल्य, तोंडी गणित कौशल्य नसण्यात आहे.

असर अहवाल दरवर्षी येत असतो आणि त्यामध्ये वाचन कौशल्याचा अभाव अधोरेखित होत असतो. त्यावर कृती नेमकी कुणी करायची? स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था (पुणे), प्रिसिजन कंपनी (सोलापूर) मुलांचे पासवर्ड त्रैमासिक अनेक शाळांमध्ये देऊन वाचन करवून घेतात. पालकांनी स्वत: रोज वाचन करता करता नियमितपणे मुलां-मुलींकडून वाचून घेतल्यास ही समस्या सुटू शकते परंतु ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ दोन्ही वर्गातील पालक वेळ देण्यास तयार नाहीत.  महाराष्ट्र शिक्षण व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत मानला जायचा, तो काळ संपल्याचे असर अहवाल दाखवतो. असर अहवालातील निरीक्षणे समाजातील सर्वच घटकांनी पुरेशा गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.

सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article