For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गव्यांच्या अपघाती मृत्युचे प्रमाण चिंताजनक

11:28 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गव्यांच्या अपघाती मृत्युचे प्रमाण चिंताजनक
Advertisement

तीन वर्षात 21 गव्यांचा मृत्यू : रेल्वे दुपदरीकरणाचा फटका : अपघात रोखण्याचे वनखात्यासमोर आव्हान : वनविभाग कोणता तोडगा काढणार?

Advertisement

बेळगाव : वन्यजीवांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी वनखाते प्रयत्नशील आहे. मात्र, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे जंगल भागातील वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: मागील तीन वर्षात रेल्वेच्या धडकेत 21 गव्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गव्यांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे नवे आव्हान वनखात्यासमोर आहे. यावर रेल्वे खाते आणि वनविभाग समन्वय साधून योग्य तोडगा काढणार का? हेच आता पाहावे लागणार आहे. वाढते शहरीकरण आणि विकासकामांमुळे वन्यप्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात दोघांचेही नुकसान होऊ लागले आहे. बेळगाव विभागात मागील काही वर्षात 110 वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. त्यापैकी तीन वर्षात 21 गव्यांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: गोवा-खानापूर आणि मिरज रेल्वे मार्गावर हे अपघात घडले आहेत.

मागील दहा वर्षात जोयडा, अळणावर, लोंढा, खानापूर, तिनईघाट, कॅसलरॉकच्या घनदाट जंगलात निष्पाप वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. या जंगलातून गेलेल्या 85 किलोमीटर लांब रेल्वे मार्गावर 110 वन्य जीवांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गवे, हत्ती, बिबटे, हरिण, अस्वल, जंगली डुक्कर आदींचा समावेश आहे. रेल्वेचे दुपदरीकरण होत असल्याने वन्य प्राण्यांना लोहमार्ग ओलांडणे कठीण होऊ लागले आहे. रात्रीच्या अंधारात रेल्वेच्या अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement

रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, रेल्वे ट्रॅक ओलांडताना वन्यप्राण्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळेच भरधाव रेल्वे अपघातात मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. मात्र, याबाबत रेल्वे खात्याला गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने जंगल परिसरात जागोजागी भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणीही वन्य प्राणीप्रेमींनी केली होती. मात्र, अद्याप या मागणीकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सुसाट वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या धडकेत निष्पाप प्राण्यांचा बळी जात आहे.

जंगलातच अन्न-पाण्याची व्यवस्था करा

जंगलात अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी रात्रीच भटकंती करत असतात. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवरूनही त्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे रेल्वे गाड्यांची धडक बसून या वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. गवे हे जास्त करून कळपाने राहतात. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या वन्यप्राण्यांमध्ये गवी रेड्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जंगलातच अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे.

वाहनांच्या धडकेतही वन्यप्राण्यांचा बळी

जंगल परिसरातून अनेक राष्ट्रीय आणि राज्यमार्ग गेले आहेत. दरम्यान, रात्रीच्या वेळी अवजड वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो.  काही वेळेला अपघात घडून वन्यप्राणी जखमी होण्याच्या घटनाही घडतात.

सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू 

जंगल परिसरात रेल्वेपासून प्राण्यांना धोका निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे खात्याला पत्र पाठविण्यात आले आहे. वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय मंत्रिमंडळातही याबाबत चर्चा झाली आहे. वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-सुनीता निंबरगी, एसीएफ, खानापूर

Advertisement
Tags :

.