राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय परिसर पुन्हा गजबजला
बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय परिसर पुन्हा गजबजू लागला आहे. शाळांच्या सहली, वनभोजन तसेच पर्यटकांकडून प्राणीसंग्रहालयाला पसंती दिली जात असल्याने हा परिसर गर्दीने फुलला आहे. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना पुन्हा एकदा प्राणी व पक्ष्यांचे विश्व जवळून पाहता येत आहे. प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, अस्वल, मगर, हरिण, कोल्हे,विविध प्रकारचे पक्षी असल्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.
केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, गोवा, धारवाड, विजापूर, बागलकोट या परिसरातूनही प्राणी पाहण्यासाठी पर्यटक बेळगावमध्ये येत असतात. मागील महिन्यात भुमरामहट्टी येथील 31 काळविटांचा अचानक मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालानंतर संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला. या प्रकारामुळे प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या रोडावली होती. दक्षतेसाठी ज्या ठिकाणी काळविटांचा मृत्यू झाला तो परिसर बंद ठेवून उर्वरित भागातील प्राणीसंग्रहालय सुरू ठेवण्यात आले. सध्या शाळांच्या सहली, वनभोजन सुरू असल्याने पुन्हा एकदा प्राणीसंग्रहालयाचा परिसर गजबजू लागला आहे. सध्या प्राण्यांचे योग्यप्रकारे लसीकरण तसेच उपचार सुरू असल्याने धोका टळल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.