पाऊस ओसरला, झाले सूर्यदर्शन!
13 जुलैपर्यंत येलो अलर्ट
पणजी : गोव्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले असून सोमवारी अनेक भागात सूर्यदर्शन झाले. हवामान खात्याने 13 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी केले आहे. गेल्या 24 तासात गोव्यात सुमारे एक इंच पावसाची नोंद झाली. यामुळे मोसमातील पाऊस आता 47 इंच झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो तीन टक्क्यांनी ज्यादा आहे. गेल्या 24 तासांमध्ये केपे येथे दीड इंच, फोंडा दीड, इंच सांगे सव्वा इंच, जुने गोवे, धारबांदोडा, मुरगाव, मडगाव, पणजी या ठिकाणी प्रत्येकी एक इंच पावसाची नोंद झाली. पेडणे व दाभोळी येथे पाऊण इंच पाऊस पडला. सांखळी, म्हापसा येथे अर्धा इंच पावसाची नोंद झाली. काणकोणातील पाऊस हा फारच नगण्य झाला. सोमवारी अनेक भागात एक दोनवेळा जोरदार पाऊस पडून गेला तर दिवसभरात चांगले स्वच्छ ऊन पडले आणि सूर्यदर्शन झाल्यामुळे झाडांसाठी व शेतीसाठी ते फार उपयुक्त ठरले. मान्सून थोडा कमजोर झाल्यामुळे गोव्यात फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही.