अंगणवाड्यांच्या आहाराचा प्रश्न ऐरणीवर
निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा : बालक-गर्भवती महिलांना धोका
बेळगाव : अंगणवाडी केंद्रातून निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा होत असल्याने बालक व गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही अंगणवाडी केंद्रांमध्ये शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या आहाराबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याबाबत महिला व बाल कल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी गांभीर्य घेणार का? हेच पाहावे लागणार आहे. शासनाकडून अंगणवाडीतील बालक आणि गर्भवती महिलांच्या आहारासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची घातला जातो. मात्र, बालक आणि गर्भवती महिलांना किडलेल्या अन् सडलेल्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत भीती व्यक्त होऊ लागली आहे. महिला व बाल कल्याणमंत्री असलेल्या बेळगाव जिल्ह्यातच हे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. बालकांच्या आहारासाठी तांदूळ, तूरडाळ, शेंगदाणे, अंडी, रवा आदी साहित्य पुरविले जाते. मात्र हे साहित्य दर्जाहीन असल्याने बालकांना पौष्टिक आहार कसा मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शासनाकडून पुरवले जाणारे धान्य पौष्टिकता वाढविण्याऐवजी आरोग्याविषयक तक्रारी वाढवण्याचे धान्य असल्याचेही बोलले जात आहे. जिल्ह्यात 5531 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे नवीन अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. या अंगणवाडी केंद्रातील बालकांना पुलावा, गूळ, शेंगदाणे दिले जातात. मात्र, हे धान्य दर्जाहीन असल्याने बालकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत. अंगणवाडी केंद्रांना चांगल्या प्रतीच्या धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही होत आहे.
आहाराबाबत तक्रारी आल्यास कारवाई
सर्व अंगणवाडी केंद्रांना चांगल्या प्रतीचा आहार पुरवला जात आहे. अंगणवाडीतील आहाराबाबत तक्रारी आल्यास कारवाई केली जाणार आहे. बिजगर्णी येथील अंगणवाडी आहाराबाबत घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली आहे.
नागराज आर. (महिला व बाल कल्याण खाते, सहसंचालक)