जनआक्रोश मोर्चाने सातारकरांचे वेधले लक्ष
सातारा :
जे भुलतात पन्नास खोक्याला, असले मंत्री हवेत कशाला?, कृषीमंत्री खेळतात रमी, कुठे आहे विकासाची हमी?, घरात बॅग पैशांची, सत्ता पन्नास खोक्यांची, महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी घोषवाक्य लिहिलेल्या पाट्या हातात घेत, मंत्र्यांचे मुकुट तोंडावर घेवून ठाकरे गटाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढून महायुती सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, या आंदोलनात लक्ष वेधून घेतले ते बुधच्या बहुरुपाने आणि अंगात आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी.
शिवसेना उबाठा गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, हर्षद कदम, संजय भोसले, शेतकरी जिल्हा प्रमुख प्रताप जाधव, उपनेत्या छाया शिंदे, जिल्हा प्रमुख अनिता जाधव, जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ नलावडे, अजित यादव, नितीन काशिद, युवा सेना जिल्हा प्रमुख महेश शिर्के, उपजिल्हा प्रमुख सागर धोत्रे, तालुका प्रमुख रमेश बोराटे, सचिन झांझुर्णे, नितीन गोळे, प्रणव सावंत, यशवंत जाधव, रवी पार्टे, संतोष जाधव, अभिषेक शिंदे, विवेक भोसले, स्वप्निल भिलारे, श्रीकांत पवार, अनिल गुजर, ज्ञानेश्वर नलावडे, सुमित नाईक, संभाजी वाघमळे, संजय जाधव, बाळासाहेब शिंदे, रवींद्र भणगे, शिवाजी चौधरी, शिवाजीराव इंगवले आदी सहभागी झाले होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचे नावलौकिक अख्या देशात जगात असून एक वेगळ्या प्रकारचा आदर्श व दबदबा आहे. परंतु सध्या चाललेल्या गलिच्छ राजकारण करून सत्तेसाठी वाट्टेल ते करायला निघालेल्या या सरकारमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे खरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मंत्र्यांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. अशा मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करणे गरजेचे होते. परंतु सत्तेसाठी हतबल असलेल्या नेतृत्वाने ही कारवाई न केल्याने या महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी व महाराष्ट्र वाचवण्यासाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातारा जिह्यातील सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी सातारा पोवई नाका शिवतिर्थ सातारा येथे जोरदार निदर्शने करून या भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना या कलंकीत व भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची आठवण करून देण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हाच्या वतीने आम्ही मोठे जनआंदोलन केले आहे. तरी याची दखल प्रशासनाने घेऊन योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
- लक्ष वेधले बहुरुप्याने अन् अंगात आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी
प्रताप जाधव यांची आंदोलने हटके असतात. याही आंदोलनात त्यांनीच बुधवरुन मांत्रिकांच्या वेशात बुध गावचे सचिन महाजन यांना आणले होते. सचिन महाजन यांनी मांत्रिकाची भूमिका हुबेहुब वटवली होती तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्यानंतर उपनेत्या छाया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या दोन महिला कार्यकर्त्यांनीही अंगात आल्याची नक्कल करुन निदर्शामध्ये रंगत आणली. आंदोलनात त्यांचीच चर्चा सुरु होती.