Sangli : वसगडेत रेल्वे बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले!
वसगडेत रेल्वे आंदोलनाला उग्र वळण; पोलिसांचा मोठा फौजफाटा
वसगडे : वसगडे येथे गेली पाच वर्षे टप्प्याटप्याने चालू असलेल्या रेल्वे आंदोलनाला सोमवारी वेगळे वळण लागले. भू भाडे मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सायंकाळपर्यंत दाद न मिळालीने शेतकऱ्यांनी आपल्या जागेवरील रेल्वे रुळावर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत चौदा आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा रेल्वे ट्रॅकजवळ तैनात करण्यात आला होता. लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सायंकाळी अटक केलेल्यांना सोडण्यात आले.
याबाबत प्राप्त माहितनुसार वसगडेतील रेल्वे बाधित शेतकरी वर्गान मोबदला मिळावा व अन्य मागण्यांसाठी गेले पाच वर्षांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आपला संघर्ष चालू ठेवला आहे. याबाबत बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. या बैठकीतील निर्णयानुसार बाधित शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवत वाटचाल करत आहेत. याबाबत शेतकरी वर्गाने ३१ ऑक्टोबर रोजी रितसर पत्र दिले होते. यावर आंदोलनकर्त्यांना १० तारखेपर्यंत थांबा योग्य निर्णय घेवू अन्यथा तुमचा मार्ग मोकळा आहे, असे संबंधितांकडून सांगण्यात आले होते.
आंदोलनकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत वाट पाहिली. परंतू काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर येथील शेतकऱ्यांनी आपल्या हद्दीत आंदोलन सुरू केले. परंतू रेल्वे पोलिस व महाराष्ट्र पोलिसांकडून जबरदस्ती करत अर्वाच्या भाषा वापरण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचं म्हणण आहे. पोलिसांकडून दडपशाही करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. तब्बल चौदा बाधित शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरुन महाराष्ट्र पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना समज देवून सायंकाळी सोडून देण्यात आले.
या घटनेनंतर वसगडेत तणाव वाढला आहे. बाधित शेतकऱ्यांनी जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. याची दिशा लवकरच ठरवण्यात येईल, असे सांगण्यात आले.