टिळकवाडीतील सायन्स पार्कची संरक्षण भिंत कोसळली
बेळगाव : टिळकवाडी येथील सायन्स पार्कची संरक्षण भिंत कोसळली. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य मार्गालगतची संरक्षण भिंत कोसळली आहे. सुदैवाने रात्रीच्यावेळी भिंत कोसळल्याने जीवितहानी टळली. लवकरच ही संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. सायन्स पार्कची संरक्षण भिंत काही महिन्यांपूर्वी कोसळली होती. त्यामुळे जनावरे आतमध्ये शिरून उद्यानाचे नुकसान करत होते. तसेच मद्यपींचा वावर वाढला होता. महापालिकेकडे अनेक वेळा मागणी केल्यानंतर भिंतीच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले. आता दुसऱ्या बाजूची संरक्षण भिंत शनिवारी रात्री कोसळल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. बऱ्याच वर्षांपूर्वी बांधलेली ही संरक्षण भिंत कमकुवत झाली आहे. सततच्या पावसामुळे भिंत एका बाजूला कलंडून ती कोसळली. या ठिकाणी दररोज शालेय विद्यार्थी खेळण्यासाठी येत असतात. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लवकर भिंतीचे बांधकाम सुरू करून उद्यानाचे संरक्षण करावे, अशी मागणी केली जात आहे.