महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचे लाभार्थीकरण होणे हा शिक्षणाचा पराभव

11:20 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रा. सुनीलकुमार लवटे : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन उत्साहात : ‘शिक्षण, शिक्षक-समाजभान’ विषयावर व्याख्यान

Advertisement

बेळगाव : शिक्षणाच्या माध्यमातून समाज मांडणीचे, देश व माणूस घडविण्याचे काम होणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने भारतीयत्वाची कोणतीच लक्षणे आपल्या शिक्षणाने विकसित केली नाहीत. आज लाभार्थी होण्याकडेच समाजाचा कल असून भारताचे लाभार्थीकरण होणे हा शिक्षणाचा पराभव आहे. शिक्षणाच्या अर्धचंद्राचा पूर्णचंद्र करण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन मंगळवार दि. 6 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी ‘शिक्षण, शिक्षक व समाजभान’ या विषयावर  प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर एसकेईचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर, अध्यक्ष विनायक आजगावकर, उपाध्यक्ष एस. व्ही. शानभाग उपस्थित होते.

Advertisement

अंतर्मुख झाल्यास विकास शक्य

सुनीलकुमार लवटे म्हणाले, आपला विकास केवळ शिक्षणानेच होऊ शकतो, हे बाबुराव ठाकुर आणि त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांनी जाणले आणि 80 वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. त्यांचा ध्येयवाद कार्यरत ठेवण्याचे कार्य ही संस्था करत आहे. कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये माणूस येतो तेव्हा त्याचे समाजभान जागे असायला हवे. माणूस जोवर अंतर्मुख होत नाही तोवर विकास अशक्य आहे. परंतु दुर्दैवाने शिक्षण या घटकाने आपल्याला भारत आणि भारतीयत्व शिकविले नाही.

शिक्षणाने व्यक्तीमध्ये सशक्तता निर्माण होऊन त्याचा कायाकल्प निर्माण व्हायला हवा. त्याचे हृदय आणि प्रवृत्ती परिवर्तन घडायला हवे. मात्र, दुर्दैवाने गेल्या 75 वर्षांत आपल्या शिक्षण पद्धतीने फक्त अभ्यासक्रम पूर्ततेचे काम केल्याची खंत व्यक्त करून लवटे म्हणाले की, शिक्षणाने चरित्र निर्माण केले नाही. त्यामुळे 75 वर्षांत आपल्यासमोर लोकनेत्यांनी जो भारत घडविला तोच असून त्याचे चित्र सुखावह नाही. भारताचे चरित्र शिक्षकांवर अवलंबून आहे. या देशाचे बळ, शिक्षण-संस्कार असून संस्काराचा संबंध मनुष्य घडणीशी आहे. वर्तमानामध्ये कोणती नवी वाट तुम्ही चोखाळता अशी सत्त्वपरीक्षा शिक्षण घेत असते. जगाने शिक्षण व्यवस्थेतून पोपटपंची घालविली असताना आपणसुद्धा ती वाट दूर सारायला हवी. नूतन शैक्षणिक धोरणामध्ये केजी ते पीजीचा एकत्रित विचार केला आहे. बदलत्या काळात येणारे शिक्षण हे शाखाधिष्ठित नसून विद्यार्थ्यांच्या आवडीवर आधारित असेल, असेही ते म्हणाले.

जगायला शिकविणारे शिक्षण हवे

सरकार बदलते तसे शिक्षणमंत्री बदलणे ही शिक्षणाची शोकांतिका आहे. धरसोड वृत्तीमुळे या शिक्षणाचे महत्त्व कमी होत आहे. शिक्षणाचे खरे परिमाण जगायला शिकविणारे हवे. त्याने स्वावलंबन शिकवायला हवे. त्याहीपेक्षा शिक्षण मनुष्य जीवनाच्या विकासासाठी, त्याच्या हितासाठी असायला हवे. वाढती अनैतिकता, दुर्वर्तन हा शिक्षणाचा सर्वात मोठा पराभव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

यापुढे शिक्षक व प्राध्यापक ही संकल्पना जाऊन मार्गदर्शक हा विचार रुजणार आहे. शिक्षण ही समस्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया हवी. येत्या काही वर्षात नवतंत्रज्ञानामुळे ज्या पेशांचे अस्तित्व नाहीसे होणार आहे त्यामध्ये शिक्षक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अशा वेळी शिक्षकी पेशातील प्रत्येकाची भूमिका बदलत जाणार आहे. त्याचा विचार करून जीवनशाळेचे शिक्षण, स्वावलंबन, नैतिकता, मानवता याची कास धरणारे शिक्षण देण्याचा विचार सर्वांनी करावा, असे सांगून डॉ. लवटे यांनी समारोप केला.

प्रारंभी श्वेता कणबरकर हिने स्वागत केले. त्यानंतर राणी पार्वती देवी व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी स्वागत केले. आरपीडी कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष बिंबा नाडकर्णी यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. प्रा. परसू गावडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. एस. एन. देसाई, एस. एस. बिजापुरे, प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ. शर्मिला संभाजी यांनी केले.

कौशल्याधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न - डॉ. किरण ठाकुर

शिक्षणाने राष्ट्रप्रेमी नागरिक निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षण ही चळवळ व्हायला हवी. एसकेईने सातत्याने शैक्षणिक दर्जा राखला आहे. यापुढे काळाची गरज ओळखून कौशल्याधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न एसकेईमध्ये केला जाईल. शिक्षणाने समाजाला एकत्र घेऊन जाणे अपेक्षित असून त्यादृष्टीने ही संस्था कार्यरत राहील. लष्कराची गरज ओळखून लवकरच तशी प्रशिक्षण संस्था सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article