कपाळावरील टिळ्याला प्राध्यापिकेचा आक्षेप ! साताऱ्यातील प्रकार; संतापापुढे निर्णय घेतला मागे
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातील प्रसिद्ध महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेने विद्यार्थ्यांच्या कपाळावर गंध लावलेला पाहून आक्षेप घेतला. त्यांना पुन्हा गंध लावायचा नाही असे म्हणताच विद्यार्थ्यांनी ही बाब बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जावून उपप्राचार्य, सर्व प्राध्यपकांशी चर्चा केली. या दरम्यान, पुन्हा असा आक्षेप घेणार नसल्याचे प्राध्यापक महिलेने सांगताच या वादावर पडदा पडला.
महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमीप्रमाणे मंगळवारीही कपाळावर गंध लावून आले होते. वर्गात बसल्यावर तास सुरू झाला. परंतु तासाला आलेल्या महिला प्राध्यपिकेने मुलांच्या कपाळावर गंध पाहिला आणि आक्षेप घेतला. गंध कशाला लावलाय, कानात का घातलंय, हातात कडे कशाला घातलंय, असे म्हणत एक एक करत सर्वच विद्यार्थ्यांना धारेवर धरले. हे ऐकून विद्यार्थ्यांना प्राध्यापिकेचे हे बोलणे पटले नाही. याचा एकाने व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी व्हिडिओ करून दिला नाही. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय गाढवे, उपाध्यक्ष उर्मिला राजेश पवार, बजरंग दल जिल्हाध्यक्ष विक्रांत विभुते, तालुकाप्रमुख शंभूराजे नाईक, दुर्गावहिनी शहरप्रमुख अस्मिता लाड, वैष्णवी ताटे यांना सांगितला. त्यांनी महाविद्यालयात येवून उपप्राचार्य, प्राध्यापक यांची भेट घेतली. यावेळी सर्व प्राध्यापकांकडून गंध लावण्याचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु विद्यार्थ्यांनी ठामपणे आपले मत मांडले. पदाधिकाऱ्यांनी गंध लावण्यावर आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे सांगितले. अर्धा तास चर्चा झाल्यावर सर्वच प्राध्यापक, प्राध्यपिका, उपप्राचार्य यांनी पुन्हा आक्षेप घेणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुलांनीही इतर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
निर्भया पथक तात्काळ पोहचले
महाविद्यालयात गंध लावण्यावरून बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थी एकत्रित जमल्याचे कळताच निर्भया पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल समाधान बर्गे यांनी तात्काळ महाविद्यालयाबाहेर आले. गर्दी पाहून त्यांनी विषय समजून घेत विद्यार्थ्यांना व पदाधिकाऱ्यांना शांततेची भूमिका घेवून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद देवून नियमांचे पालन करण्याची हमी दिली.