भारतीय संघासमोर जखमी खेळाडूंची समस्या
वृत्तसंस्था/ पर्थ
रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर चषक पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या मालिकेतील पहिली कसोटी येथे 22 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. दरम्यान कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासमोर दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या निर्माण झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज के.एल. राहुल तसेच विराट कोहली यांना सरावावेळी दुखापती झाल्या आहेत.
यष्टीरक्षक आणि फलंदाज के. एल. राहुल शुक्रवारी येथे नेटमध्ये सराव करताना त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. त्याच प्रमाणे भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहलीला फलंदाजीचा सराव करताना उजव्या हाताला दुखापत झाली असून तो तातडीने स्कॅनिंग करण्यासाठी रुग्णालयात गेला असल्याची माहिती येथील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. मात्र कोहलीच्या दुखापतीबाबत सविस्तर माहिती कळू शकली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये विराट कोहली आणि कर्णधार रोहीत शर्मा फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. शुक्रवारी सरावावेळी ऋषभ पंत आणि उपकर्णधार बुमराह यांनी कसून सराव केला. के.एल. राहुलच्या दुखापतीबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही सविस्तर माहिती मिळू शकली नाही. राहुलची ही दुखापत किरकोळ नसल्याने तो पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.
विराट कोहलीच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 80 शतके झळकविणाऱ्या विराटने 2024 च्या क्रिकेट हंगामातील 19 आंतरराष्ट्रीय सामन्यात 20.33 धावांच्या सरासरीने केवळ 488 धावा जमविल्या आहेत. त्याने 25 डावांत केवळ 2 अर्धशतके नोंदविली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विराट मोठी खेळी करण्यासाठी झगडत आहे. 2016 ते 2019 या कालावधीत कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने फलंदाजी करताना 66.79 धावांच्या सरासरीने 16 शतके आणि 10 अर्धशतकांसह 4208 धावा जमविल्या आहेत. 2020 पासून कोहलीचा फलंदाजीचा सूर हरवला आहे. अलिकडेच मायदेशात झालेल्या बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये कोहलीने 10 डावांत केवळ 192 धावा जमविल्या असून त्यात 1 अर्धशतकाचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या आगामी कसोटी मालिकेत वेगवान खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाजीची तसेच फलंदाजीची सत्वपरीक्षा ठरणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आतापर्यंतच्या कसोटी मालिकांमध्ये अलिकडच्या कालावधीत भारतीय संघ वरचढ असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गेल्या चार सलग कसोटी मालिका जिंकल्या आहेत. भारताने 2018-19 तसेच 2020-21 हंगमातील क्रिकेट मालिका जिंकल्या आहेत. उभय संघात ठेवण्यात आलेला बॉर्डर-गावसकर चषकावर भारताने आतापर्यंत 10 वेळा तर ऑस्ट्रेलियाने पाचवेळा आपले नाव कोरले आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी अॅडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर दिवस-रात्रीची खेळविली जाणार आहे. तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 14 ते 18 डिसेंबर, दरम्यान खेळविली जाईल. त्यानंतर चौथी कसोटी बॉक्सींग डे कसोटी म्हणून ओळखली जात असून हा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबोर्न येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटची व पाचवी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळविली जाईल.
भारतीय कसोटी संघ-रोहीत शर्मा (कर्णधार), बुमराह (उपकर्णधार), आर. आश्विन, मोहम्मद शमी, अभिमन्यु ईश्वरन, गिल, रविंद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, विराट कोहली, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, के. एल. राहुल, हर्षित राणा, नितीशकुमार रे•ाr, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.