For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा सर्व्हिस रस्ता-बसफेरीचा प्रश्न बनला गंभीर

11:22 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
हलगा सर्व्हिस रस्ता बसफेरीचा प्रश्न बनला गंभीर
Advertisement

सर्व्हिस रस्ता स्थानिकांसाठी धोकादायक : अवजड वाहनांची वाहतूक वाढली : रस्त्याची दयनीय अवस्था, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका, बस फेऱ्याच नाहीत

Advertisement

वार्ताहर /किणये

अलारवाड क्रॉस ते हलगा गावच्या सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. रस्ता खराब झाला असल्यामुळे बसफेऱ्या दुसऱ्या बाजुच्या रस्त्यांनी जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सुवर्ण विधानसौधजवळ असलेल्या हलगा गावात एकही बसफेरी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. हलगा गावचा सर्व्हिस रस्ता स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. कारण रस्त्यावरून रोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या मोठमोठ्या टिप्पर, डंपर, बाराचाकी, अठरा चाकी ट्रक यामुळे रस्ता अक्षरश: खचून गेला आहे. सदर रस्त्यावरून दुचाकी चालविणे अवघड झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. काही ठिकाणी तर रोड खचून दोनफुटापर्यंत खड्डेs पडलेले आहेत. रात्रीच्यावेळी या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडून अनेक किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.

Advertisement

गेल्या सात-आठ दिवसापूर्वी या सर्व्हिस रस्त्यावरून जात असताना एक मोठी ट्रक रस्त्यात अडकली होती. यामुळे अन्य वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सदर ट्रक काढण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागला. या रस्त्यावर यापूर्वीही बरीच अवजड वाहने रुतलेली आहेत. त्यामुळे हा सर्व्हिस रस्ता केवळ अवजड वाहनधारकांसाठीच आहे. स्थानिकांना मात्र या रस्त्यावरुन वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. मागील पंधरा वर्षापासून या रस्त्यावर अवजड वाहतूक सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्या असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहे. हलगा गावाजवळ विविध प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. तसेच कॉलेजला बेळगावला जाण्यासाठी विद्यार्थी या रस्त्याच्या बाजुला थांबलेले असतात. मात्र या मोठ्या वाहनांमुळे या विद्यार्थ्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.

या सर्व्हिस रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ कमी व्हावी. यासाठी ग्रा. पं.ने मागील दोन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यालाही कळविण्यात आले होते. तसेच सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, असेही सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2004 साली या सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. 20 वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित असून अधूनमधून केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते. सध्या मात्र रस्ता अतिशय खराब झाला आहे. हलगा गावच्या जमिनी सुवर्ण विधानसौध बांधण्यासाठी दिल्या आहेत. सुवर्ण विधानसौधजवळ असलेल्या या गावाला एकही बसफेरी नाही. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बेळगावला येताना बरीच कसरत करावी लागते. अन्य गावातील बसचा आधार घ्यावा लागतो. बऱ्याचवेळेला दुसऱ्या गावावरून येणाऱ्या बसेस फुल्ल असतात. त्यामुळे हलगा गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. यामुळे तासन्तास त्यांना बसथांब्यावर ताटळकत बसावे लागते. बस्तवाड, के. के. कोप्प, मास्तमर्डी, चंदनहोसूर गावातील बसवर हलगा गावातील प्रवासी व विद्यार्थी अवलंबून आहेत. सध्या हलगा गावचा सर्व्हिस रस्ता खराब झाला असल्यामुळे या बसेस हायवे रस्त्याच्या अन्य बाजूने जात आहेत.

परिवहन मंडळाला निवेदन देऊनही दखल नाही

हलगा रस्त्याजवळील काही धाब्यांच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला मोठी वाहने थांबविली जातात. यामुळे अन्य वाहनधारकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. याचाही विचार क्हायला हवा. हलगा सर्व्हिस रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक वाढलेली आहे. यामुळे दुचाकी व अन्य वाहनधारकांना वाहतूक करणे मुश्किल बनले आहे. रस्ताही खराब झालेला आहे. हलगा गावची लोकसंख्या सुमारे 10हजार इतकी आहे. मात्र गावाला एकही बस नाही. पंधरा दिवसापूर्वी परिवहन मंडळाला याबाबत ग्रा.पं.ने निवेदन दिले आहे. तरीही याची दखल घेण्यात आलेली नाही. हलगा गावाला स्वतंत्र बस फेरी होणे गरजेचे आहे.

- सदानंद बिळगोजी, ग्रा. पं. सदस्य हलगा 

रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण करा

हलगा-बस्तवाड सर्व्हिस रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण करावे. तसेच हलगा गावाजवळील मिलजवळ विद्यार्थी बसची वाट पाहत थांबतात त्याठिकाणी बसथांबा नाही. यामुळे विद्यार्थ्यांना उन, पावसात ताटकळत थांबावे लागते. त्याठिकाणी बसथांबा बांधण्याची आवश्यकता आहे. हलगा व बस्तवाड गावातील सर्व्हिस व मुख्य रस्त्यासाठी प्रशासनाने निधी मंजूर करून कामकाज लवकर सुरू करावे.

- मनोहर काकतकर, बस्तवाड

Advertisement
Tags :

.