For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समन्वयाच्या अभावामुळेच शहरात समस्या

01:28 PM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
समन्वयाच्या अभावामुळेच शहरात समस्या
Advertisement

बेळगाव : शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. विविध समस्यादेखील भेडसावत आहेत. याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता स्मार्ट सिटी, एलअॅण्डटी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच समस्या उद्भवत आहेत, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत. पाण्याची समस्या तर वारंवार निर्माण होत आहे. एलअॅण्डटी कंपनीचे काम दर्जात्मक नाही. तसेच सदर कंपनीचे अधिकारी सहकार्य करत नाहीत. बेळगावच नाही तर इतर ठिकाणीही त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत. तेव्हा संबंधित कंपनीवर कारवाई करणार का? असे विचारले असता, बैठक घेऊन त्यांना समज देण्यात येणार आहे.

Advertisement

कारवाई करायची असेल तर सरकारच्या माध्यमातून करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने योग्य सूचना दिल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.शहर तसेच जिल्ह्यामध्ये विविध विकासकामे राबविण्यासाठी सरकारने पाऊल उचलले तरी कोणतीच कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे सरकार ही कामे कधी पूर्ण करणार, यामध्ये एसटीपी प्लॅन्ट (सांडपाणी प्रकल्प), विविध रस्ते, प्रकल्प अर्धवटच आहेत. त्याबाबत पुढे काय करणार? असे विचारले असता, काहीजण न्यायालयात गेल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र निश्चितच त्यावर तोडगा काढून हे सर्व प्रकल्प मार्गी लावले जातील. एकूणच सरकारच्या माध्यमातून विकास करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.

पशुसंगोपन खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार का?

Advertisement

पशुसंगोपन खात्यातून चारा खरेदीसाठी 4 कोटी काढण्यात आले. मात्र चाराच खरेदी करण्यात आला नाही. याचबरोबर कोठेही चारा बँक सुरू केली नाही. त्यामुळे त्या खात्यात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करणार का? याबाबत पत्रकारांनी विचारले असता सदर रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यातून खर्च केली जाते. त्यामुळे पशुसंगोपन खात्याचा यामध्ये कोणताही संबंध नाही. त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. तरीदेखील असे काही आढळले तर निश्चितच त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी आमदार विश्वास वैद्य, आमदार राजू सेठ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.