मिठाईचा दर 1.11 लाख रुपये
हे शीर्षक वाचून ऐन दिवाळीत आपले तोंड कडू होण्याची शक्यता आहे. कारण दिवाळी हा मिठाई खाण्याचाच सण असतो. घरात तर फराळाचे विविध तिखट-गोड पदार्थ पेले जातातच, पण बाजारातूनही तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया आणून फराळाच्या ताटाची शोभा वाढविली जाते. बहुतेक मिठाया आपल्या खिशाला झेपेल अशा दराच्या असतात. पण या दिवाळीचा आनंद शतगुणित करण्यासाठी राजस्थानची राजधानी जयपूर येथे ‘स्वर्णप्रसादम्’ नामक एका वैविध्यपूर्ण मिठाईचे उत्पादन करण्यात आले आहे. या मिठाईचा दर प्रतिकिलो 1 लाख 11 हजार रुपये आहे.
हा गोड पदार्थ चविष्ट तर आहेच, पण शरिराच्या पोषणासाठीही उपयुक्त आहे. तो ‘पाईन नट्स्’ पासून बनविण्यात आलेला असून त्यात सुवर्ण भस्म आणि केशर हे शरिराचे सामर्थ्य वाढविणारे पदार्थही योग्य प्रमाणात मिश्रित केलेले आहेत. या पदार्थाचा आकारही एका जैन मंदिराच्या रचनेप्रमाणे आहे. हा पदार्थ निर्माण करताना उपयोगात आणलेली प्रत्येक साधनसामग्री अत्यंत शुद्ध स्वरुपातील आणि खाणाऱ्याच्या प्रकृतीच्या हिताचा विचार करुन निवडलेली आहे. शुद्ध केशराचा उपयोग सढळ हाताने केला असल्याने या पदार्थाला एक वेगळाच स्वाद लाभला आहे, असे त्याच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. सर्वसाधारणपणे साखर आणि तूप अधिक प्रमाणात घालून केलेले पदार्थ चवीला उत्तम असले, तरी अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरिराला बाधकही ठरु शकतात. त्यामुळे दिवाळीचा फराळ अती झाला. तर पोट बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, हा विशेष पदार्थ असा आहे, की जो त्याच्या सेवनानंतर खाणाऱ्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवितो. त्यामुळे हा पदार्थ खाणाऱ्यांना बाधणार नाही, अशी दक्षता विशेषत्वाने घेण्यात आली आहे.
केवळ हा एकच पदार्थ नव्हे, तर अन्य उत्पादनकर्त्यांनी बनविलेले आणखी दोन पदार्थ सध्या महानगरांच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. ‘सुवर्णभस्म भारत’ नावाची एक अप्रतिम स्वादाची मिठाई 85 सहस्र रुपये किलो या भावाने उपलब्ध आहे. ‘तसेच चंडी भस्म भारत’ नामक एक विशेष पदार्थ 58 सहस्र रुपये प्रतिकिलो या भावाने उपलब्ध आहे. अर्थातच, हे पदार्थ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी ज्यांची एवढा खर्च करण्याची क्षमता आहे, त्यांचा दीपावलीचा आनंद तरी निश्चितच वाढवितील, असे मानले जात आहे.