स्थानिक फुटबॉलपटूंचा वाढला भाव, संघ व्यवस्थापनाची वाढली डोकेदुखी
कोल्हापूर /संग्राम काटकर :
छत्रपती शाहू स्टेडियममध्ये डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोल्हापुरी फुटबॉल हंगामाचा किकऑफ होईल असे संकेत आहेत. त्यामुळे वरिष्ठ 16 फुटबॉल संघ व्यवस्थापनाने स्टार खेळाडूंना घेऊन संघ बांधणीला जोर लावला आहे. खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी दबक्या आवाजात आर्थिक व्यवहार केले जात आहेत. या व्यवहारात स्थानिक स्टार खेळाडूंकडून संघातून खेळण्यासाठी सव्वा लाख ते दोन लाख रुपये मानधनाची मागणी संघ व्यवस्थापनाकडे केली आहे. दुसऱ्या फळीतील खेळाडूही विविध संघातून खेळण्यासाठी महिन्याला 10 ते 15 हजार ऊपयांची मागणी करताहेत. कोल्हापूर जिह्याबाहेरील तीन खेळाडूंना घेऊन संघ स्ट्राँग करण्यावरही संघ व्यवस्थापनाने लक्ष केंद्रीत केले आहे. परंतू हे खेळाडू संघ व्यवस्थापनाकडे महिन्याला 50 ते 70 हजार ऊपये मागणी करताहेत. त्यामुळे सहाजिकच संघ व्यवस्थापनाची पैसे उभा करण्यासाठी त्रैधातिरपीट उडत आहे.
गतवर्षीच्या फुटबॉल हंगामापासून परदेशी खेळाडूंना वरिष्ठ फुटबॉल संघातून डच्चू देण्याचा केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली. मालोजीराजे यांच्या या निर्णयामुळे स्थानिक खेळाडूंना जणू सुगीचेच दिवस येऊन कोल्हापुरी फुटबॉलचे सारे अर्थचक्र बदलून गेले होते. स्थानिक व कोल्हापूर जिह्याबाहेरील राष्ट्रीय खेळाडूंना दिलेल्या लाखो ऊपयांची गतवर्षीच्या हंगामात मोठी चर्चाही रंगली होती. तसेच खेळाडूंनी संघातून खेळण्यासाठी मानधनाची वाढवलेली रक्कम पाहून संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी वाढली होती. परंतू तरीही पेठा-पेठांमधील ईर्ष्येखातर आपला संघ तगडा करण्याच्या भावनेने संघ व्यवस्थापन स्थानिक स्टार व जिह्याबाहेरील 3 खेळाडूंना योग्य पैसे देऊन संघ बांधणी केली होती. मात्र पैस जमवताना व्यवस्थापनाने मोठी धावपळही केली होती. यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी तर स्थानिक स्टार खेळाडू संघातून खेळण्यासाठी सव्वा लाख ते दोन लाख ऊपयांची मागणी करताहेत. ही मागणी पाहून संघ व्यवस्थापन अक्षरश: अवाक झाले आहे. दुसऱ्या फळीतील खेळाडूंची आर्थिक मागणीही संघ व्यवस्थापनाला बुचकळ्यात टाकत आहे. परंतू थोडे बारगेनिंग करतानाच योग्य रक्कम ठरवून खेळाडूंना संघात स्थान दिले जात आहे. तिसऱ्या फळीतील खेळाडूसुद्धा हंगामासाठी 40 ते 50 हजार रुपये संघातून खेळण्यासाठी मागणी करत आहेत.
स्थानिक खेळाडूंच्या आर्थिक मागणीला तोंड देतानाच संघ व्यवस्थापनाला कोल्हापूर जिह्याबाहेरील 3 खेळाडूंनाही आपल्या संघात स्थान देण्यासाठी फार विचार करावा लागतोय. कारण जिह्याबाहेरील खेळाडू प्रत्येक महिन्याला 50 ते 70 हजार ऊपये मानधनाची मागणी करताहेत. ही मागणी संघ व्यवस्थापनाला अवाच्या सव्वा वाटत आहे. परंतू नाईलाज पे क्या ईलाज याप्रमाणे व्यवस्थापनाने जिह्याबाहेरील खेळाडूंना आपल्या संघात घेऊन संघ स्ट्राँग करण्यासाठी जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवली आहे. खेळाडूंना मानधन ऊपाने किती पैसे दिले हे दिसत असले तरी फुटबॉल सामने खेळताना खेळाडूंना होणाऱ्या इंज्युरीवरील (दुखापत) उपचारासाठी किती पैसे खर्च केले हे कोणालाच दिसत नाही. इंज्युरी खर्च पेलण्यासाठी यंदाही व्यवस्थापनाने ठराविक रक्कम राखीव ठेवली आहे.
खेळाडूंना परफॉर्मन्स हा दाखवावाच लागेल...
फुटबॉल संघातून खेळण्यासाठी खेळाडूंना द्यावे लागणारे मानधन आणि सामन्यात होणाऱ्या इंज्युरीवरील खर्च भागवणे यासाठी संघ व्यवस्थापनाला 17 ते 20 लाख ऊपये जमवावे लागले आहेत. दुसरीकडे खेळाडूंवर पैसे लावतानाच व्यवस्थापन खेळाडूंकडे सामन्यात परफॉमेन्स दाखवण्याची अपेक्षा व्यक्त करताहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामातून मागणीप्रमाणे पैसे हवे असतील तर पुढील हंगामातही आपला भाव वाढीवच ठेवायचा असेल तर खेळाडूंना परफॉमेन्स हा दाखवावाच लागेल.
सरावातील अनियमितता...
खेळाडूंनी संघातून खेळण्यासाठी जास्तीचे मानधन मागताना आत्मपरिक्षण करावे लागेल. फुटबॉल हंगामात परफॉमेन्स करण्यासाठी सराव हा अनिवार्यच आहे. परंतू बरेच खेळाडू सकाळच्या सरावासाठी मैदानात नियमित येत नाही. एक-दोन दिवस सरावाला आले की पुढील दोन-तीन दिवस सरावाला दांडी मारणारेही अनेक खेळाडू आहेत. खेळाडूंच्या सरावातील अनियमिततेचा संघाच्या परफॉमेन्सवर परिणाम होतो. त्याचा त्रास आम्हाला होतो, असेही संघाचे पदाधिकारी सांगत आहेत.