श्वानामुळे राष्ट्राध्यक्षांना मागावी लागली माफी
चिशिनाउ : दोन देशांचे नेते जेव्हा परस्परांना भेटतात तेव्हा अनेक मुद्द्यांवर भागीदारीपासून महत्त्वपूर्ण करार होत असतात. अशाचप्रसंगी दोन्ही देशांच्या संबंधांची पारख होत असते. परंतु एका पाळीव श्वानामुळे राष्ट्राध्यक्षांनाच माफी मागावी लागण्याचा प्रकार घडला आहे. ऑस्ट्रिया आणि मोल्दोवा यांच्यात हा विचित्र प्रकार घडला असून याकरता मोल्दोवाचा ‘फर्स्ट डॉग’ कारणीभूत ठरला आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झेंडर वान डेर बेलेन यांचा मोल्दोवाच्या अध्यक्ष माइया सँडू यांच्या श्वानाने चावा घेतला. वान डेर बेलेन हे अधिकृत दौऱ्याकरता मोल्दोवामध्ये पोहोचले होते. यादरम्यान अध्यक्षीय प्रासादात फिरत असताना सँडू यांचा पाळीव श्वान त्यांना दिसला, त्याला कुरवळण्यासाठी ते खाली वाकल्यावर श्वानाने चावा घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. ऑस्ट्रियन अध्यक्षांनी देखील या घटनेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मी श्वानांना किती पसंत करतो हे मला ओळखणारे लोक जाणतात. सँडू यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी माफी मागितली आहे. तसेच कोड्रट हे नाव असलेला श्वान लोकांच्या गर्दीमुळे घाबरून गेला होता असे ऑस्ट्रियन अध्यक्षांनी नमूद केले आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या पाळीव प्राण्याने अशाप्रकारचे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या पाळीव श्वानाने सिक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांचा चावा घेतला होता. यामुळे या श्वानाला व्हाइट हाउसमधून हटविण्यात आले आहे.