For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मिक बळाचे सामर्थ्य मोठे असते

06:45 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आत्मिक बळाचे सामर्थ्य मोठे असते
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

गणेशगीतेच्या अभ्यासाला सुरवात केल्यानंतर बाप्पाना अभिप्रेत असलेला योग शब्दाचा अर्थ, तो कसा साधायचा, त्यासाठी आवश्यक असलेले आत्मिक बळ मिळवण्यासाठी निरनिराळे समाधीप्रकार कोणते, ते सिद्ध झाल्याने माणूस ईश्वराशी का जोडला जातो आणि त्याचवेळी जगापासून अलिप्त का होतो आदि बाबी आपण समजून घेतल्या. असे योगसामर्थ्य मिळवलेल्या साधकांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान्य माणसांपेक्षा वेगळा असतो. त्याबद्दल आता बाप्पा आपल्याला सांगणार आहेत. पुढील श्लोकात ते सांगतात,

पावयन्त्यखिलान्लोकान्वशीकृत जगत्त्रया: ।

Advertisement

करुणापूर्णहृदया बोधयन्त्यपि कांश्चन ।।14।।

अर्थ-त्रैलोक्याला वश करणारे ते योगी सकल जनांना पावन करतात. त्यांचे हृदय करुणेने पूर्ण असल्यामुळे ते पुष्कळांना योगाचे ज्ञान देतात.

विवरण-भगवदगीतेत भगवंत अर्जुनाला तू ज्ञानी, तपस्वी, कर्मिष्ठ होण्यापेक्षा योगी हो असा सल्ला सहाव्या अध्यायात देताना म्हणतात,

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा ।

मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ।। 6.46 ।।

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्यापेक्षा योगी आगळा आहे असं भगवंत म्हणतात कारण पहिल्या तिघांना कसली ना कसली अपेक्षा असते पण योगी संपूर्ण निरपेक्ष असतो आणि संपूर्ण निरपेक्ष असणं हे मोक्ष मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. असे महापुरुष सर्वत्र संचार करत असतात. त्यांचे महात्म्य एव्हढे असते की, त्यांच्या नुसत्या दर्शनाने, स्पर्शाने, त्यांचे बोलणे ऐकण्याने, इतकेच काय त्यांच्या अंगावरून वहात आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शानेदेखील लोक पवित्र होतात. त्यांच्या हातून लोकोद्धाराचे कार्य सहजी होत असते. सभोवतालचे लोक विचित्र वागणारच हे गृहीत धरून त्यांचे विचित्र वागणे मनाला लावून न घेण्यासाठी आवश्यक ते आत्मिक बळ त्यांनी यापूर्वी वर्णन केलेल्या समाधी साधनेतून मिळवलेले असते. त्यामुळे ते कायम स्वस्थ असतात. आणखी एक म्हणजे ते हेही जाणून असतात की, कोणत्याही जीवाची वागणूक त्याच्या प्रारब्धानुसार व नंतरच्या संस्कारानुसार होत असल्याने निरनिराळ्या प्रसंगात त्यांच्या हातून घडणाऱ्या वागणुकीकडे असे सत्पुरुष दुर्लक्ष करतात. सगळ्यांच्याबद्दल त्यांच्या हृदयात करुणा भरलेली असते म्हणून ते स्वत: लोकांशी अतिशय चांगलं वागत असल्याने लोक आपोआप त्यांना वश होतात. वेळप्रसंगी लोक देवाला बाजूला सारून त्यांच्या भजनी लागतात. असे असले तरी योग्यता बघूनच ते लोकांना उपदेश करतात. अपात्र व्यक्तींना उपदेश म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी हे ते जाणून असतात. तसेच नियतीचे उल्लंघन करणे ते योग्य समजत नाहीत.

अशा प्रकारे वर्तणुक असलेल्या संत महतांची, सिद्ध योग्यांची चरित्रे आपल्या वाचनात असतात. आपल्या सद्गुरूंचे चरित्र तर आपल्यासमोर असतेच असते. त्यांनी केलेले लोककल्याण, दाखवलेल्या लीला, लोकांच्या वागण्याकडे केलेले दुर्लक्ष इत्यादि गोष्टींचा उलगडा बाप्पांच्या सांगण्यावरून आपल्याला होतो. समाधी साधनेतून मिळवलेल्या आत्मिक बलाचा वापर करून होताहोईतो लोककल्याण करणे हे महात्म्यांचे एकमेव ध्येय असते. त्यांची आणखीन लक्षणे बाप्पा सांगतायत ती अशी,

जीवन्मुक्ता ह्रदे मग्ना: परमानन्दरूपिणि ।

निमील्याक्षीणि पश्यन्त:परं ब्रह्म हृदि स्थितम् ।।15।।

अर्थ-ते जीवन्मुक्त असतात व परमानंदसागरामध्ये मग्न असतात. डोळे मिटून देखील परब्रह्म आपल्या हृदयामध्ये पाहतात.

विवरण-हे सत्पुरुष अन्य लोकांच्याप्रमाणेच जीवन जगत असतात पण त्यांची देहबुद्धी नष्ट झालेली असल्याने त्यांना मी म्हणजे हा देह असे वाटत नसते. त्यामुळे त्यांना षड्रिपुंची बाधा कधी होत नाही. म्हणून त्यांना बाप्पा जीवन्मुक्त म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.